औरंगाबाद : डेमू रेल्वेचा अपघात टळला; चालकाचे प्रसंगावधान | पुढारी

औरंगाबाद : डेमू रेल्वेचा अपघात टळला; चालकाचे प्रसंगावधान

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : ट्रॅक मशिन आधीपासूनच प्लॅटफॉर्म नंबर १ वर उभे असताना, नगरसोल जालना डेमूही त्याच ट्रॅकवर आली, तेवढ्यात डेमूच्या चालकाच्या ही बाब लक्षात आल्याने त्याने वेळीच प्रसंगावधान राखत रेल्वे थांबविली आणि डेमूमधील हजारो प्रवाशांचा जीव वाचला. शुक्रवारी (दि. २५) सायंकाळी घडलेल्या या घटनेची गंभीर दखल घेत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकारी- कर्मचाऱ्यांना नांदेड येथे चौकशीसाठी बोलावले आहे.

लासूर स्टेशन येथे इलेक्ट्रिक लाइन टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम करण्यासाठी ट्रॅक मशिन शुक्रवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास प्लॅटफार्म नंबर १ वर उभी केलेली होती. तर नगरसोल – जालना डेमू (गाडी नंबर ०७४९२) येण्याची वेळ झाल्याने तिला २ नंबर प्लॅटफार्मवर येण्याचे सिग्नल देण्यात आले होते, मात्र त्याचवेळी सिग्नल सिस्टीम ड्रिप झाली अन् सिग्नल बंद पडले, त्यामुळे डेमू गाडीही प्लॅटफार्मवर नंबर १ वर येण्यासाठी वळली, तेवढ्यात ट्रॅकवर आधीच मशिन उभी असल्याचे डेमूच्या चालकाच्या लक्षात आले, त्यांनी प्रसंगावधान राखत डेमू थांबवली, तर त्याच वेळी समोर उभ्या असलेल्या ट्रॅक मशिनच्या चालकानेही लाईट चालू-बंद करत डेमूच्या चालकाला सिग्नल देण्यास सुरुवात केली. दोन्ही चालकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

बिघाड की मानवी चूक ?

रेल्वे चालकांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला, हे जरी खरे असले तरी, सिग्नलबाबत झालेली चूक ही मानवी होती की तांत्रिक बिघाड? असा प्रश्न उपस्थित होत आहे. घटनेची माहिती वरिष्ठांपर्यंत गेल्याने, त्यांनी कार्यरत असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना नांदेड येथे चौकशीला बोलावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Back to top button