‘मविआ’ सरकार रात्रीत कोसळले, उद्याचे काहीही सांगता येत नाही : रावसाहेब दानवे | पुढारी

‘मविआ’ सरकार रात्रीत कोसळले, उद्याचे काहीही सांगता येत नाही : रावसाहेब दानवे

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा :  महाविकास आघाडीचे सरकार जाईल, असे कुणालाही वाटत नव्हते. मात्र, रात्रीतून ते कोसळले. उद्या नेमकी राजकीय परिस्थिती काय असेल, याचा अंदाज बांधता येत नाही. राजकीय परिस्थिती गोंधळलेली असून, कधी काय होईल याचा नेम नाही. त्यामुळे जनतेची कामे करा, असा सल्ला रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिला.

कन्नड तालुक्यातील सिरजगाव येथे सोमवारी झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना दानवे म्हणाले, पूर्वी राजा पोटातून जन्माला यायचा, आता मतपेटीतून राजा निवडला जातो. तुमच्या अंगावर किती सोने आहे यावर राजकारण ठरत नाही; तर तुमच्यासोबत लोक आहेत यावर किंमत ठरत असते. राजकारण करायचे असेल, तर तुमच्यासोबत लोक असले पाहिजेत. भाजपचे गृहमंत्री अमित शहा व उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा झाल्यानंतरच लोकसभा, विधानसभेत शिवसेना-भाजप युती झाली. मात्र, निकाल लागल्यानंतर आपल्याशिवाय भाजप राज्यात सरकार बनवू शकत नाही, असे लक्षात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपला सोडून महाविकास आघाडी केली. महाविकास आघाडीचे सरकार पडेल, असे कोणास वाटत नव्हते; परंतु अशी जादू झाली की अडीच वर्षांत सरकार कोसळले.

Back to top button