औरंगाबाद : चुलत्याचा मृतदेह आणण्यासाठी निघालेल्या पुतण्यावर काळाचा घाला | पुढारी

औरंगाबाद : चुलत्याचा मृतदेह आणण्यासाठी निघालेल्या पुतण्यावर काळाचा घाला

पाचोड; पुढारी वृत्तसेवा :   पाच दिवसांपूर्वी अपघातात गंभीर जखमी झालेल्या चुलत्याचा उपचारदरम्यान घाटीत मृत्यू झाला. त्यांचा
मृतदेह घेऊन जाण्यासाठी विहामांडवा (ता.पैठण) येथून दुचाकीवर पुतण्या निघाला होता. औरंगाबादजवळ एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिल्याने या दुर्घटनेत त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.9) घडली. अनिल भरत तांबे (28), दीपक अण्णा तांबे (20) असे चुलते पुतण्याचे नावे आहेत.

विहामांडवा येथील आचारीचे काम करणारे अनिल तांबे यांच्या दुचाकीची व केकत जळगाव येथील एका रस्त्यावरून पायी चालणार्‍या महिलेचा पाच दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या घटनेत अनिल तांबे यांच्या डोक्याला मार लागला होता. नातेवाईकांनी त्यांना गंभीर
अवस्थेत औरंगाबादला घाटीत उपचारार्थ दाखल केले होते. गुरुवारी रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. अनिल तांबे यांचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी त्यांचा पुतण्या दीपक तांबे हा मित्राची दुचाकी घेत विहामांडव्याहून शुक्रवारी सकाळी (दि. 9) औरंगाबादकडे निघाला होता. औरंगाबादेतील बीड बायपासवरील सातारा परिसरात सूर्या लॉन्स समोर सकाळी साडे सात वाजेच्या दरम्यान एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिली. या दुर्घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालक वाहनासह पसार झाला. शुक्रवारी संध्याकाळी चुलते आणि पुतण्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबीयांनी फोडलेला हंबरडा पाहून जमलेल्या नातेवाईकांचे डोळे पाणवले.

Back to top button