औरंगाबाद : साहेब नुसतं तांदळावरच जगायचं का आम्ही | पुढारी

औरंगाबाद : साहेब नुसतं तांदळावरच जगायचं का आम्ही

अंधारी, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील शेतकर्‍यांना एपीएल शेतकरी योजनाअंतर्गत तीन किलो गहू तर दोन किलो तांदूळ आतापर्यंतच दिले जात होते मात्र गेल्या तीन महिन्यांपासून एपीएलधारक शेतकरी कुटुंबातील कार्डधारकांना रेशन दुकानांनी कात्री लावल्याने केवळ प्रतिव्यक्‍ति दोन किलो तांदळाचा समाधान मानावे लागत आहे त्यामुळे शासनाच्या या निर्णयाला शेतकर्‍यांतून विरोध होत आहे. साहेब आता नुसते तांदूळच कसे खायचे आम्ही असा प्रश्न शेतकरी करू लागले आहेत.

सिल्‍लोड तालुक्यात एकूण दहा हजार सातशे तेहतीस कार्डधारक आहेत या कार्डधारकांना मध्ये सुमारे अडुसष्ठ हजार तीनशे अकरा शेतकर्‍यांची संख्या आहेत राज्यात दुष्काळग्रस्त असणार्‍या चौदा जिल्ह्यांतील शेतकर्‍यांना एपीएल शेतकरी योजनेंतर्गत प्रतिव्यक्‍ती तीन किलो गहू आणि दोन किलो तांदळाचे वितरण केले जात होते. दुष्काळग्रस्त चौदा जिल्ह्यांमध्ये मराठवाड्यातील जिल्ह्यांचा सहभाग होता. मात्र शासनाने आता दुष्काळग्रस्त भागात असणार्‍या चौदा जिल्ह्यांतील शेतकर्‍यांच्या हक्‍काचे गव्हाला कात्री लावली. तालुक्यात एकूण 205 स्वस्त धान्य रेशन दुकाने आहेत या रेशनच्या अंतर्गत लाभार्थ्यांना प्रतिव्यक्‍ती तांदूळ आणि गव्हाचे वितरण केले जाते. शासनाने रेशन दुकानात अंतर्गत विविध वर्गवारी पध्दत करून शेतकरी कुटुंबातील कार्डधारक, प्राधान्य शेतकरी कुटुंब कार्डधारक, शासकीय नोकरीला असणारे कार्डधारक अशी वेगवेगळी वर्गवारी केली आहे. वर्गवारीच्या माध्यमातूनच गावखेड्यातील लाभार्थी कुटुंबांना स्वस्त धान्य दिले जाते मात्र शासनानेच आता एपीएलधारक शेतकरी योजनेत गहू बंद करून प्रतिव्यक्‍ती केवळ दोनच किलो तांदूळ गेल्या तीन महिन्यांपासून सुरू केला आहे.

प्राधान्य कुटुंबातील शेतकरी
सिल्‍लोड तालुक्यामध्ये एपीएलधारक शेतकर्‍यांसह प्राधान्य कुटुंबातील शेतकर्‍यांनाही दोन किलो तांदूळ तीन किलो गव्हाचे वितरण केले जात होते. गेल्या तीन महिन्यांपासून रेशन दुकानांतून दिल्या जाणार्‍या गव्हाला कात्री लावली आहे. या शेतकर्‍यांना केवळ तांदूळच मिळत आहे .

Back to top button