औरंगाबाद : लॉण्ड्रीचा खर्च परवडेना; अडगळीतील इस्त्री बाहेर | पुढारी

औरंगाबाद : लॉण्ड्रीचा खर्च परवडेना; अडगळीतील इस्त्री बाहेर

औरंगाबाद; जे. ई. देशकर :  महागाईच्या चटक्याने त्रस्त झालेल्या औरंगाबादकरांनी लॉण्ड्रीचे बिल परवडत नसल्याने अडगळीत पडलेली इस्त्री बाहेर काढली आहे. त्यामुळे शहरातील लॉण्ड्रीचालकांवर उपासमारींची वेळ आली असून, अनेकांनी जोडधंद्यांकडे मोर्चा वळवला आहे.

कपड्याची इस्त्री नीट आहे की नाही, हे पाहणारे नागरिक आता महागाईच्या चटक्यांमुळे इस्त्रीच्या घडीकडे पाहत नाहीत. दोन वर्षांपूर्वी
10 ते 12 रुपयांत प्रेस होणार्‍या ड्रेससाठी आता 20 ते 22 रुपये मोजावे लागत असल्याने अनेकांनी इस्त्रीच्या घडीचा मोह सोडला असून, घरात अडगळीत पडलेल्या इस्त्री बाहेर काढल्या आहेत. आजघडीला लॉण्ड्रीचे दर वाढले असले, तरी या महागाईच्या दुष्टचक्रात लॉण्ड्रीचालकही अडकला असल्याने त्यालाही घर चालवणे जिकिरीचे बनले आहे. वाढते भाडे, वाढते वीजदर यांमुळे लॉण्ड्रीचालकाला महागाईचे चटके सहन करत, प्रपंच चालवण्याची कसरत करावी लागत आहे. त्याहीपेक्षा सर्वसामांन्यांचे वाईट हाल झाले आहेत.

जोडव्यवसायांवर मदार : लॉण्ड्रीच्या व्यवसायाला महागाईच्या चटक्यांमुळे घरघर लागल्याने जोडव्यवसाय म्हणून लॉण्ड्रीसमारेच भाजीपाल्याची गाडी लावलेली आहे. यातून घर चालवण्यास मदत होत असल्याची माहिती लॉण्ड्रीचालक प्रदीप राक्षे यांनी दिली.

40 टक्के ग्राहक घटले
महागाईमुळे अनेकांनी अडगळीत पडलेल्या इस्त्री बाहेर काढल्यामुळे याचा परिणाम लॉण्ड्रीचालकांवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. सुमारे 40 टक्के ग्राहक घटले, त्यामुळे उत्पन्नही मोठ्या प्रमाणात घटले आहे. दुकान भाडे व वीजबिल भरता-भरता लॉण्ड्रीचालकांच्या नाकी नऊ येत आहेत. ग्राहक वाढवण्यासाठी विविध प्रयत्न सुरू असून अद्याप तरी याला प्रतिसाद मिळत नसल्याची खंत लॉण्ड्रीचालक व्यक्‍त करत आहेत.

प्रकार                    2 वर्षापूर्वीचे दर            आताचे दर
ड्रेस इस्त्री                     10 ते 12                   20 ते 22
ड्रेस ड्रायक्लिन                 40                              60
ड्रेस स्टार्च                     130-140                       200
साडी ड्रायक्लिन                100                          130
साडी रोल प्रेस                    30                           60

Back to top button