औरंगाबाद : त्या’ तीन महाविद्यालयांचे काय होणार; सुनावणी पूर्ण | पुढारी

औरंगाबाद : त्या’ तीन महाविद्यालयांचे काय होणार; सुनावणी पूर्ण

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी टपरीछाप महाविद्यालयांविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. भौतिक सुविधा, पुरेसे प्राध्यापक नसलेल्या पाच महाविद्यालयांना ‘नो प्रवेश झोन’मध्ये टाकून दंडात्मक कारवाई केल्यावर उर्वरित पाचपैकी तीन महाविद्यालयांची सुनावणी गुरुवारी झाली. या महाविद्यालयांबाबत कुलगुरू डॉ. प्रमोद येवले काय आदेश देतात, याकडे लक्ष लागले आहे.

यामध्ये पडेगाव, पाथ्री तसेच औरंगाबाद शहरातील एका महाविद्यालयाचा समावेश आहे. या महाविद्यालयांची तपासणी झाल्यानंतर महाविद्यालयांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली होती. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी महाविद्यालयांचे म्हणणे ऐकून घेतले.आता या महाविद्यालयांबाबत काय निर्णय होतो, हे पाहावे लागेल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ठरवून दिलेले नियम, निकषांचे उल्‍लंघन करणाऱ्या महाविद्यालयांची चौकशी केली जात आहे. अशाच 10 महाविद्यालयांतील सोयीसुविधांची समितीमार्फत पडताळणी करण्यात आली. त्यानंतर व्हिडीओ चित्रफितीसह सत्यशोधन अहवाल समित्यांनी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे सादर केला. त्यावर 5 महाविद्यालयांची बाजू कुलगुरूंनी ऐकून घेतली होती, आता उर्वरित 5 पैकी 3 महाविद्यालयांची बाजूही ऐकून घेण्यात आली आहे. सोयीसुविधा न देणे, आवश्यक अध्यापकांची नेमणूक न करणे, शासन आदेशाचे उल्‍लंघन करणे, पायाभूत सुविधा नसल्याने महाविद्यालयांना दंड आकारण्यात आला आहे

Back to top button