औरंगाबाद : बहिणीकडून राखी बांधून येणाऱ्या भावावर काळाचा घाला | पुढारी

औरंगाबाद : बहिणीकडून राखी बांधून येणाऱ्या भावावर काळाचा घाला

पाचोड; पुढारी वृत्तसेवा : रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणीच्या नात्यातील गोडवा अधोरेखित करणारा सण म्हणून ओळखला जातो. रविवारी रक्षाबंधनानिमित्त बहिणीकडे राखी बांधण्यासाठी गेलेल्या भावाचा परतून येत असताना काळाने घाला घातला.

एका भरधाव इंडिकाने पाठीमागून दुचाकीला जोराची धडक दिल्याने या भीषण अपघातात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना औरंगाबाद सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील थापटी तांडा (ता. पैठण) गावानजीक रविवारी रात्री घडली. कल्याण अंबादास  सोळूंके (वय ३१, रा.अंबड जि.जालना) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कल्याण राखी पौर्णिमासाठी आपल्या बहिणीकडे वाळूज (जि. औरंगाबाद) येथे गेला होता. रक्षाबंधनाचा कार्यक्रम आटोपून तो अंबडकडे परतत असताना औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील थापटी तांडा गावाजवळ त्याच्या दुचाकीला (एमएच २० एफएफ ०४८३) पाठीमागून आलेल्या एका इंडिका कार (एमएच २१ व्ही ७२६५ )ने पाठीमागून जोराची धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकी लांबपर्यंत उडून कोसळली. यामध्ये कल्याणचा डोक्यावर आदळल्याने जागेवरच मृत्यू झाला. अपघाताची माहिती स्थानिक नागरिकांनी पाचोड पोलीसांना कळविली.

कल्याण टोलनाक्याच्या रुणवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, पण त्याला मृत घोषित करण्यात आले.

सकाळी उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातेवाईकांना दिला. मयत कल्याण सोळूंके यांच्या पश्चात्ताप दोन लहान मुली पत्नी असा परिवार आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

अन भावाच्या मृत्यूने बहिणीचा टाहो फोडला

रक्षाबंधनासाठी मोठ्या आनंदाने आलेल्या कल्याणला त्याच्या बहिणीने हातावर बांधलेली राखी त्याच्या आयुष्यातील शेवटची ठरेल याची बहिणीला पुसटची जाणीव देखील नसेल.

राखी बांधून घराकडे निघालेल्या  भावाच्या मृत्यूची वार्ता जेव्हा बहिणीच्या कानी पडली तेव्हा तिने एकच टाहो फोडल्याचे दृश्य बघून उपस्थितांना देखील अश्रू अनावर झाले.

हे ही वाचलं का?

Back to top button