अमरनाथ यात्रा : आभाळाएवढे दु:ख ढगफुटीने समोर आणले | पुढारी

अमरनाथ यात्रा : आभाळाएवढे दु:ख ढगफुटीने समोर आणले

प्रवीण देशपांडे; परभणी : अमरनाथ गुहेकडे जाण्यासाठी बालटालच्या प्रवेशद्वारावर पोहोचण्यास उशिर झाल्याने पुढे प्रवेश मिळाला नाही. मात्र रात्रीच ढगफुटीचा तो भयावह निरोप मिळाल्यानंतर तब्बल तीन दिवस बालाटालच्या हरियाणा भंडारमध्ये काढण्याची वेळ आली. यादरम्यान, अमरनाथहून परतणार्‍या शोकविव्हल व दुःखाचा डोंगर कोसळताना डोळ्यांनी पाहिलेल्या भाविकांचे अनुभव ऐकताना ते तीन दिवस दुःख व आक्रोशाने अत्यंत वेदनादायी असे होते, परभणीच्याशिक्षिका द्रोपदी गायकवाड सांगत होत्या.

परभणीच्या एन.व्ही. एस.मराठवाडा हायस्कुलमध्ये शिक्षिका असलेल्या द्रोपदी लक्ष्मण गायकवाड व सायळा खटींग येथील स्वातंत्र्यवीर सावरकर हायस्कूलच्या शिक्षिका निर्मला ग्यानबा पांढरे यांच्यासह जिल्ह्यातील जिंतूर, चारठाणा, येलदरी येथील 24 जण अमरनाथ यात्रेसाठी परभणीहून दि.7 रोजी रात्री देवगिरी एक्सप्रेसने रवाना झाले होते. दुसर्‍या दिवशी श्रीनगर येथे मुक्काम करून सकाळी ती मंडळी बालटाल येथील बेसकॅम्प ओलांडून अमरनाथ गुहेकडे रवाना होणार होती. परंतू बेसकॅम्पपासून चार किलोमीटर अंतरावर असलेले प्रवेशद्वार सकाळी 9 वाजताच बंद झाले होते. त्यांना पोचण्यास 11 वाजल्याने हरियाणा भंडारमध्ये थांबावे लागले. दुसर्‍या दिवशी त्यांना प्रवेश मिळणार होता. सायंकाळी भंडारमध्ये साडेसहाच्या सुमारास आरती सुरू होतानाच गुहेजवळ ढगफुटी झाल्याचा संदेश येवून धडकल्यावर सर्वच हतबल झाले. दरम्यान, शिक्षीका गायकवाड व पांढरे या दोघींनी सोमवारी (दि.11) सकाळी भंडार सोडून श्रीनगरकडे आपला प्रवास सुरू केला. यासंदर्भात तेथील अनुभव कथन करतांना गायकवाड या भावूक झाल्या होत्या. तीन दिवस व तीन रात्री फक्त आणि फक्त ढगफुटीचे अनुभव ऐकण्यातच गेले. ढगफुटी झाल्यानंतर लोक बालटालमार्गे परतत होते. आपल्यासोबतचे कोण राहिले, कोण कसे निसटले हे सांगतांना त्यांना अश्रूही आवरत नव्हते. काही लोकांनी तर आपल्याजवळील बॅगा व अन्य सर्व साहित्यही तेथेच टाकून दिले होते. ते भयंकर अनुभव ऐकताना आभाळाएवढे दुःख या ढगफुटीने समोर आणल्याचे जाणवत होते, असेही गायकवाड म्हणाल्या.

Back to top button