औरंगाबाद : राजीनाम्यांची स्टंटबाजी; युवक काँग्रेसचे सहा पदाधिकारी अडचणीत | पुढारी

औरंगाबाद : राजीनाम्यांची स्टंटबाजी; युवक काँग्रेसचे सहा पदाधिकारी अडचणीत

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : शहराचे नाव संभाजीनगर करण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ काँग्रेसच्या अनेक पदाधिकार्‍यांनी राजीनामे दिले, मात्र प्रदेशाध्यक्ष, शहराध्यक्षांना लेखी न कळविता, या पदाधिकार्‍यांनी केवळ राजीनामे दिल्याची स्टंटबाजी केल्याचे उघड झाले आहे, आता या स्टंटबाज पदाधिकार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचे युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सागर नागरे यांनी शुक्रवारी (दि.1) सांगितले.

महाविकास आघाडी सरकारने 29 जून रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला. त्यास
विरोध म्हणून काँग्रेस पक्षातील सुमारे 18-20 पदाधिकार्‍यांनी आपल्या पदाचा राजीनामादेखील देत, तशा बातम्याही विविध वर्तमानपत्रात छापून आणल्या आहेत. यात युवक काँग्रेसचे सहा पदाधिकारी आहेत. यात प्रदेश युवक काँग्रेसचा एक पदाधिकारी आहे.

विशेष म्हणजे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, शहाराचे प्रभारी अभिजित चव्हाण यांनादेखील लेखी स्वरूपात माहिती दिली नाही, माझ्याकडेही राजीनामे दिले नाही, असे सागर नागरे यांनी सांगितले. मला कल्पना न देता, माझे नाव राजीनाम्यात टाकले आहे. ही बाब  मी वरिष्ठांना कळविली. पक्षाविरोधी खोटी माहिती दिल्याप्रकरणी या सहाही पदाधिकार्‍यांवर लवकरात लवकर कारवाई करण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष राऊत व प्रभारी चव्हाण यांनी दिले आहेत, असेही नागरे यांनी सांगितले.

Back to top button