औरंगाबाद : ‘माझी इच्छा नाही; पण दुसरा पर्याय नाही’ म्हणत महिलेची आत्महत्या | पुढारी

औरंगाबाद : ‘माझी इच्छा नाही; पण दुसरा पर्याय नाही’ म्हणत महिलेची आत्महत्या

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : ‘लोकांचे तीन ते चार लाख रुपयांचे देणे आहे. ते देता येत नाही. त्यात घरमालकही सतत किरायाचे पैसे मागतात. मरावे, अशी माझी इच्छा नाही, पण कर्जबाजारीपणामुळे दुसरा पर्यायही नाही. किमान माझ्यानंतर तरी कुटुंबीयांची कर्जातून मुक्तता करा’, अशी सुसाईड नोट लिहून ठेवत एका महिलेने गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले. क्रांती चौक ठाण्याच्या हद्दीतील खोकडपुर्‍यात दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आशा चंपालाल तरटे (45, खोकडपुरा) असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आशा तरटे या कुटुंबीयांसह खोकडपुर्‍यात राहत होत्या. त्यांचे पती भाजी विक्रीचा व्यवसाय करतात तर त्या गृहिणी होत्या. त्यांच्याकडे अनेकांचे जवळपास तीन ते चार लाख रुपये देणे झाले आहे. अनेकदा प्रयत्न करूनही पैसे परत करता येत नाहीत. मागणार्‍यांचा तगादा सुरूच होता. त्यात घरमालक किरायाचे पैसे मागत असल्याने आणखी त्रास होऊ लागला. त्यामुळे मुले शाळेत आणि पती कामानिमित्त बाहेर गेल्यावर महिलेने खोलीत गळफास घेतला. दुपारी मुलगी घरी आली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर क्रांती चौक पोलिसांना माहिती मिळाली. वरिष्ठ निरीक्षक डॉ. गणपत दराडे यांच्या सूचनेवरून सहायक पोलिस निरीक्षक डॉ. विशाल इंगळे हे तत्काळ घटनास्थळी गेले. त्यांनी पाहणी करीत पंचनामा केला आणि मृतदेह घाटीत नेला. या प्रकरणी क्रांती चौक ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मुले लावायचे बाहेरून कुलूप

आशा तरटे यांना 22 आणि 17 वर्षांचे दोन मुले व 13 वर्षांची मुलगी आहे. लहान मुलगा आणि मुलगी शाळेत जातात. शुक्रवारी सकाळी मुलगी आधी शाळेत गेली त्यानंतर 17 वर्षांचा मुलगा गेला. त्याने जाताना घराला बाहेरून कुलूप लावले होते. दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास मुलगी आली तेव्हा तिने शेजार्‍यांकडून चावी घेऊन कुलूप उघडले. दार लोटताच समोर आईचा लटकलेला मृतदेह दिसला. मुले बाहेर जाताना सतत बाहेरून कुलूप लावायचे. पैसे मागायला येणार्‍यांना घरी कोणीच नाही, असे वाटावे म्हणून ते कुलूप लावत असावेत, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

Back to top button