औरंगाबाद : जागेच्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी | पुढारी

औरंगाबाद : जागेच्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : जागेच्या वादातून दोन गट भिडले. जवळपास दीडशे ते दोनशे जणांच्या जमाव एकत्र आल्याने तुंबळ गर्दी जमली. पोलिसांनी वेळीच दाखल होऊन जमावावर नियंत्रण मिळविले. तोपर्यंत जमावाने मारहाण करीत लाठ्या-काठ्यांनी वाहनांची तोडफोड केली. ही घटना 29 जूनला रात्री पावणे नऊच्या सुमारास पैठणगेट जवळील आंबेडकर पुतळा, सब्जीमंडी येथे घडला.

या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले असून पोलिसांनीही सर्वांवर दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे प्रत्येकाविरुद्ध दोन गुन्हे दाखल झाले आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक डॉ. गणपत दराडे यांनी दिली. राणी राहुल मगरे (32, रा. सब्जी मंडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर, पैठणगेट) यांनी दिलेल्या फिर्यादीत किशोर भोळे, महेंद्र भोळे, राजेश भोळे, आशाबाई राजेश भोळे, महेंद्र राजेश भोळे, किशोर ऊर्फ शैलेंद्र राजेश भोळे, मनीषा दिनेश सोनवणे, दिनेश सोनवणे, सेवक बागवाले, मिनाज हे आरोपी आहेत. तर, शैलेंद्र राजेंद्र भोळे यांनी दिलेल्या फिर्यादीत अनिल भिमराव मगरे, नंदाबाई अनिल मगरे, मयूर अनिल मगरे, शुभम अनिल मगरे, मनीष रतन मगरे, कमलाबाई भीमराव मगरे, राहुल भीमराव मगरे, राणी राहुल मगरे, नितेश भीमराव मगरे, शिवा मोतीलाल मगरे, लखन मोतीलाल मगरे, कैलास नामदेव ढगे, चंद्रकलाबाई शंकर साळवे, सुरेखा उत्तम नरवडे, गणेश पुंजाजी चाबुकस्वार, रेखाबाई गणेश चाबुकस्वार, विक्की कैलास ढगे आदींसह अनेकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांतर्फे उपनिरीक्षक अमोल सोनवणे यांनी फिर्याद दिली. त्यात दोन्ही गटाच्या तब्बल दीडशे ते दोनशे जणांना आरोपी करण्यात आले आहे.

Back to top button