

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : शहराचे नाव संभाजीनगर करण्याची घोषणा झाल्यानंतर तब्बल 34 वर्षांनी नामांतरचा निर्णय झाला, याचप्रमाणे औरंगपुरा येथील सर्वात जुनी असलेल्या भाजीमंडईचाही प्रश्न रखडलेला आहे. भाजीमंडई हटवून त्याठिकाणी बीओटी तत्त्वावर शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याचे काम गेल्या दहा-अकरा वर्षांपासून सुरूच आहे. हे काम कधी पूर्ण होणार, याबाबत काहीही सांगता येत नाही.
शहराच्या नामांतराप्रमाणे या कामालाही 34 वर्षे लागू नये, अशी अपेक्षा याठिकाणी लहानमोठा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणाऱ्या भाजीविक्रेते आणि दुकानदारांकडून व्यक्त होत आहे. सन 1974 पासून औरंगपुऱ्यातील भाजीमंडई सुरू आहे. याठिकाणी दीडशे दुकानांमध्ये फळ व भाजी विक्रेते आणि 34 दुकानदार आपला व्यवसाय करत होते. सन 2011 मध्ये तत्कालीन मनपा आयुक्तांनी बीओटी तत्त्वावर (बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा) या भाजीमंडईचा विकास करण्याची योजना आणली. त्यास भाजीविक्रेते व दुकानदारांनी विरोध केला. मनपा अधिकाऱ्यांनी त्यांना कागदपत्रांची मागणी केली. फळ, भाजीपाला विक्रेते युनियनच्या माध्यमातून ही लढाई लढली गेली. मनपा प्रशसनाने करार करून 18 महिन्यांत नवीन दुकाने बांधून देण्याचे आश्वासन दिले. मार्च 2012 मध्ये येथील गाळे व दुकाने रिकामी करून घेण्यात आली, तोपर्यंत या दुकानदारांना व्यवसायासाठी भाजीमंडई जवळीलच जागा देण्यात आली. व भाजीमंडईवर बुलडोझर फिरवला गेला. शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्यासाठी ठेकेदारांची नियुक्तीही होऊन कामाचा शुभारंभही झाला. खोदकाम केल्यानंतर सातत्याने निघणारे पाणी, जागेचा वाद यासह विविध कारणांनी कामाची गती मंदावली. तीन मजल्यापर्यंतचे कॉलम आणि स्लॅबचे काम झालेले आहे. इतकीच काय ती कामाची प्रगती गेल्या दहा-अकरा वर्षांत झालेली आहे. हे काम पूर्ण करून ताबा द्यावा, अशी मागणी गाळेधारक व दुकानदारांकडून होत आहे.
भाजीमंडईत दीडशे फळ व भाजीपाला विक्रेत्यांचे गाळे होते. मनपाने भाडेतत्त्वावर हे गाळे दिलेले होते. भाजीमंडईच्या जागेवर 18 महिन्यांत शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधून गाळे देण्याचा लेखी करारही मनपा प्रशासनाने केलेला आहे. आता तिथे तीन मजली बांधकाम केले आहे. सर्वांना तळमजल्यावर दुकाने देऊ, असे सांगितले होते. कामही बऱ्याच दिवसांपासून बंद आहे.
– शशिकला खोबरे, सचिव, विक्रेता युनियन.भाजीमंडईच्या जागेवरील शॉपिंग कॉम्प्लेक्सचे काम रखडलेले असल्याने,
विकासकाला नोटीस बजावून, काम त्वरित सुरू करण्यास सांगितले होते. त्याने अठरा महिन्यांची मुदत मागितली आहे. येत्या 18 महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण होईल.
– सखाराम पानझडे, शहर अभियंता, मनपा.