औरंगाबादच्या नामांतरावर खासदार इम्तियाज जलील म्हणाले, “काँग्रेस-राष्ट्रवादी नेते…” | पुढारी

औरंगाबादच्या नामांतरावर खासदार इम्तियाज जलील म्हणाले, "काँग्रेस-राष्ट्रवादी नेते..."

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : औरंगाबादचे नामांतर होत असताना राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काय करीत होते? सत्तेसाठी एवढ्या खालच्या स्तरावर गेले की, जिल्हाचा इतिहास मिटविण्यास निघाले. जिल्ह्याचे नाव औरंगाबाद होते आणि पुढेही तेच राहणार, असे म्हणत ‘एमआयएम’चे खासदार इम्तियाज जलील संभाजीनगरच्या नामांतरावर संताप व्यक्त केला. दोन्ही काँग्रेसचे नेते दलाल असल्याचे म्हणत जिल्ह्यात एमआयएम त्यांचे चांगले स्वागत करेल, असा इशाराही इम्तियाज जलील यांनी दिला.

मराठवाड्यातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांच्या नामंतरावर बुधवारी राज्याच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आला. या निर्णयावरून जलील म्हणाले की, औरंगाबाद या नावाला इतिहास आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना पक्षाच्या वतीने जेव्हा हे नाव बदलून संभाजीनगर, असे करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. तेव्हा सत्तेतील दोन्ही कॉंग्रेसचे मंत्री काय करीत होते, सत्तेसाठी ते एवढ्या खालच्यास्तरावर जातील, असे वाटले नाही.

शरद पवार, सोनिया गांधी यांनी या प्रस्तावास का विरोध केला नाही? त्यांचे तोंड का बंद आहे, असे म्हणत दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांचे  एमआयएम शहरात चांगलेच स्वागत करेल, असा इशारा त्यांनी दिला. औरंगाबादमधील सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शहराचा विकास केल्यानंतरच जिल्ह्याचे नाव संभाजीनगर करेन, असे जाहीर केले होते. दोन आठवड्यात असा काय विकास झाला की, त्यांनी लागलीच शहराचे नाव बदलून टाकण्याचा प्रस्ताव मंजूर केला, असा सवालही खा. जलील यांनी या वेळी उपस्थित केला.

हेही वाचलंत का?

Back to top button