पैठण : ’भानुदास एकनाथ’च्या गजरात पालखीचे प्रस्थान | पुढारी

पैठण : ’भानुदास एकनाथ’च्या गजरात पालखीचे प्रस्थान

पैठण, पुढारी वृत्तसेवा : वारकर्‍यांचा आनंदसागर सोहळा म्हणून जुनी परंपरा असलेला विठ्ठल-रखुमाई आषाढी वारी सोहळा श्रीक्षेत्र पंढरपूर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. दि. 10 जुलै रोजी सोहळ्याच्या परंपरेत मानाचे स्थान असलेल्या पैठण येथील संत एकनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्याने सोमवारी (दि. 20) सायंकाळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत ‘भानुदास एकनाथ‘च्या
जयघोषात प्रस्थान करण्यात आले.

सोमवारी दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी गावातील संत एकनाथ महाराज यांच्या वाड्यातील देवघरातून पालखी प्रमुख नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी पालखीवाले यांच्या मार्गदर्शनाखाली नाथवंशज ज्ञानेश महाराज, योगेश महाराज, रवींद्र महाराज पांडव, सचिन महाराज पांडव, श्रीकृष्ण कुलकर्णी यांनी पवित्र नाथांच्या पादुका विविध फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये विराजमान केल्या. ‘चला पंढरीला जाऊ, रखुमादेवीवरा पाहूं, डोळे निवतील कान, मना तेथें समाधान, संता महंता होतील भेटी, आंनदे नाचों वाळवंटी’ असे अभंग, टाळ-मृदंगाच्या गजरात पालखी सोहळ्याने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.

सोहळ्यातील प्रमुख सहभाग असलेल्या महाराज मंडळीने चक्री अभंग सादर केले. नाथांच्या पवित्र पादुकांची वाजतगाजत टाळ-मृदुंगाच्या गजरात कावळे गल्‍ली, उदासी महाराज मठमार्गे निघालेली पालखी काही वेळासाठी नाथ महाराज मंदिरात समाधीसमोर
विसावली. तसेच भाविकांच्या दर्शनासाठी गोदातीरी गागाभट्ट चौकातील पालखी ओट्यावर पंचक्रोशीतील भाविकांच्या दर्शनासाठी पवित्र पादुका दरवर्षीप्रमाणे ठेवण्यात आल्या होत्या.

या सोहळ्यात सहभागी झालेल्या हजारो वारकऱ्यांनी परिसरात भजन, कीर्तन, भारूड सादर केले. सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळेत हजारो भाविकांनी पालखीवर पुष्पवृष्टी करीत फटाक्यांची आतषबाजीत सोहळ्याचे प्रस्थान झाले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी डॉ. स्वप्नील मोरे, तहसीलदार दत्तात्रय निलावाड, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहुल, पोलिस निरीक्षक किशोर पवार, माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे, मुख्याधिकारी संतोष आगळे, जिल्हा परिषद माजी सभापती विलास बापू भुमरे, नाथमंदिर कार्यकारी विश्वस्त दादा पाटील बारे, दूध संघाचे संचालक नंदलाल काळे, नायब तहसीलदार गिरिजाप्रसाद आवळे, विष्णू घुगे, मंडळाधिकारी गणेश सोनवणे, सा.बां. उपअभियंता राजेंद्र बोरकर, नामदेव खरात, गणेश मडके, रखमाजी महाराज नवले, गंगाराम महाराज राऊत, चनघटे महाराज, तळपे महाराज, महालिंग महाराज, भानुदास महाराज अमरावतीकर, तुळशीराम काकडे महाराज, रामआहुजा, पवन लोहिया, कल्याण बरकसे, राजकुमार रोहरा, श्याम पंजवानी यांच्यासह पंचक्रोशीतील हजारो भाविक उपस्थित होते.

दरम्यान, पालखी सोहळ्याचा पहिला मुक्‍काम चनकवाडी येथे आहे, मात्र पालखी मार्गाची दुरवस्था पाहून कामामध्ये हलगर्जीपणा करणार्‍या अधिकाऱ्याविरुद्ध वारकर्‍यांनी तीव्र संताप व्यक्‍त करून संबंधित अधिकार्‍यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी छावा क्रांतिवीर सेनेचे प्रदेश सरचिटणीस अनिल राऊत, मराठवाडा अध्यक्ष रामेश्वर बावणे यांनी तहसीलदार दत्तात्रय निलावाड यांना निवेदन देऊन पालखीला सर्व सुविधा मिळाव्यात, अशी मागणी केली आहे.

जिल्हा परिषदेमार्फत वारकर्‍यांना पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करून आरोग्य पथक सेवा उपलब्ध करण्यात आली. तसेच नगर परिषदेमार्फत औषधी उपलब्ध करून देण्यात आली. नाथ मंदिर समितीचे अध्यक्ष तथा राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे यांनी सालाबादाप्रमाणे पैठण ते पंढरपूरपर्यंत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. तसेच 24 तास विश्व हिंदू परिषदेचे आरोग्य पथक कार्यरत असणार आहे. तसेच पंचायत समितीच गटविकास अधिकारी ओमप्रसाद रामावत यांनी सॅनिटायझर उपलब्ध करून दिले आहे

Back to top button