Sucide : विष प्राशन करून शेतकऱ्याने केली आत्महत्या | पुढारी

Sucide : विष प्राशन करून शेतकऱ्याने केली आत्महत्या

शिवना, पुढारी वृत्तसेवा : सततची नापीकी डोक्यावर झाला कर्जाचा डोंगर घरी अवघी दीड एकर जमीन, त्यातही दुबार पेरणीचे संकट आणि स्वतः वर असलेले ग्रामीण बँकेसह खाजगी कर्जाची परतफेड कशी करावी या विवंचनेत सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील एका वृद्ध शेतकऱ्याने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली ही घटना रविवारी रात्री नऊच्या सुमारास घडली.

शिवना येथील पुंडलीक नामदेव काळे (वय ७३) यांची शिवना शिवारात अवघी दीड एकर जमीन आहे. एवढ्या जमिनीतील उत्पन्नावर ते एक मुलगा आणि आपल्या पत्नीचा उदरनिर्वाह चालवत होते. त्यांचेवर ग्रामीण बँकेसह खाजगी कर्जाचा बोजा वाढलेला होता. यावर्षी पावसाने ताण दिल्याने केलेली पेरणी वाया गेली. यावर्षी परणी केली मात्र त्यावर पाऊस पडला नाही. परत दुबार पेरणीचे संकट ओढवल्याने पैसा उपलब्ध नव्हता.

वृद्धत्वामुळे खचलेल्या पुंडलीक नामदेव काळे यांनी शनिवारी (दि. १८) सकाळी विषप्राशन केले. नातेवाईकांनी त्यांना तातडीने औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र रविवारी रात्री नऊच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. घाटी रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. सोमवारी दुपारी त्यांच्यावर शिवना येथील काळे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेबाबत ग्रामस्थांनी महसूल प्रशासन तसेच पोलीस प्रशासनास माहिती दिली. पिडित शेतकऱ्याच्या कुटुंबीयांस नुकसान भरपाई मिळावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

हेही वाचा

Back to top button