

गौरीशंकर घाळे, मुंबई
शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांसह समाजाच्या सर्वच घटकांना डोळ्यांसमोर ठेवून बनविलेला संकल्पपत्र अर्थात जाहीरनामा भाजपने मांडला आहे. संकल्पपत्राच्या माध्यमातून कृतिशील कार्यक्रमाचा आराखडा मांडतानाच राजकीय वास्तवाचे भानही भाजपने राखल्याचे स्पष्टपणे जाणवते. संकल्पपत्रातून विविध घोषणांची जंत्री साधतानाच आम्ही आमचे संकल्प सिद्धीस नेतो, असा ठाम दावाही भाजपने केला आहे.
विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपने 29 जणांची जाहीरनामा समिती बनविली होती. शिवाय, नागरिकांच्या सूचनाही मागविल्या. त्यातून आलेल्या 8 हजार 935 सूचनांची दखल घेत भाजपने 15 मुद्द्यांवर एक विस्तृत संकल्पपत्र मतदारांसमोर मांडले आहे. भाजपच्या संकल्पपत्रातील पहिले दहा संकल्प हे महायुतीकडून नागरिकांना दिलेली संयुक्त आश्वासने आहेत. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या कोल्हापुरातील पहिल्या प्रचार सभेत ती जाहीर केली. यात लाडक्या बहिणींना दर महिन्याला दिला जाणारा निधी 1500 वरून 2100 रुपये करण्याचे आश्वासन आहे. आर्थिक साक्षरतेच्या प्रशिक्षणासोबतच महिला सुरक्षेसाठी 25 हजार महिलांचा पोलिस दलात समावेश करण्याचे आश्वासन आहे.
शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी देतानाच शेतकरी सन्मान योजनेचा निधी 12 हजारांवरून 15 हजार करण्याचे आश्वासन आहे. शिवाय, हमीभावावर 20 टक्के अनुदान, खतांवरील राज्य जीएसटी कराचा परतावा आणि सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान सहा हजार रुपयांचा भाव देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा दिला जाईल. वृद्ध पेन्शनधारकांच्या रकमेत वाढ, राज्यात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्यात येतील, 25 लाख रोजगारांची निर्मिती करतानाच दर महिन्याला दहा लाख विद्यार्थ्यांना दहा हजारांचे विद्यावेतन देण्यात येणार आहे.