साताऱ्यात शरद पवारांचा वारू शिंदे-फडणवीस रोखणार का?

Assembly election 2024 : मकरंद पाटील यांच्या विरोधात तगडा उमेदवार येणार?
Assembly election 2024
साताऱ्यात शरद पवारांचा वारू शिंदे-फडणवीस रोखणार का?File Photo
Published on
Updated on

सातारा जिल्ह्यातील ८ विधानसभा मतदारसंघांत जोरदार चुरस रंगणार आहे. राष्ट्रवादीचे संस्थापक खा. शरद पवार यांनी टाकलेल्या जाळ्यात मोठे मासे गळाला लागल्याने सातारा जिल्ह्याच्या राजकारणाने पुन्हा एकदा कलाटणी घेतली आहे. अजित पवार गटातील मोहरे खेचून थोरल्या पवारांनी बालेकिल्ल्यावर पकड मजबूत करण्याचे इरादे दाखवले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही सातारा जिल्ह्यात महायुती मजबूत कशी राहील, याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

शिवेंद्रराजेंविरोधात राष्ट्रवादी की उबाठा? सातारा-जावली विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व प्रदीर्घ काळ आ. शिवेंद्रराजे भोसले करत आहेत. पूर्वी राष्ट्रवादीतून तर आता भाजपमधून ते आमदार आहेत. येणाऱ्या निवडणुकीत ते भाजपमधूनच निवडणूक लढवणार आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विजयात शिवेंद्रराजेंचा मोठा वाटा राहिला आहे. त्यामुळे विधानसभेला खा. उदयनराजे शिवेंद्रराजेंच्यासोबत राहणार आहेत. शिवेंद्रराजेंच्या विरोधात महाविकास आघाडीमधून दीपक पवार यांच्या नावाची चर्चा आहे. दीपक पवारांनी यापूर्वी अनेकदा शिवेंद्रराजेंना कडवी झुंज दिली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष असलेले अमित कदम यांनी शरद पवारांकडे सातारा- जावलीची उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतच उमेदवारीवरून ट्विस्ट तयार झाले आहे. शिवसेना उध्दव ठाकरे गटातून माजी आमदार सदाशिवराव सपकाळ यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. तर जिल्हाध्यक्ष सचिन मोहिते यांनीही उमेदवारी मागितली आहे.

मकरंद पाटील यांच्या विरोधात तगडा उमेदवार येणार?

वाईत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आ. मकरंद पाटील हे महायुतीतून निवडणूक रिंगणात असणार आहेत. लोकसभेला वाईत तुतारी वाजल्याने आ. मकरंद पाटील यांच्याविरोधात महाविकास आघाडीतून इच्छुकांची अक्षरशः खिचडी झाली आहे. आ. मकरंद पाटील यांचे पारंपरिक विरोधक भाजपचे मदनदादा भोसले यांच्या घरी राष्ट्रवादीचे जयंत पाटील चहा पिवून गेल्यानंतर जोरदार चर्चा झाली. मात्र, मदनदादांनी राष्ट्रवादीत येण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे मकरंद पाटील यांच्या विरोधातील उमेदवाराला मदन भोसले यांचा आतून पाठिंबा असेल. शिवसेनेचे पुरुषोत्तम जाधव यांनी मात्र जोरदार रान उठवले आहे. महायुतीतून ते बंडखोरीच्या तयारीत आहेत. प्रसंगी तुतारी हातात घेण्याचीही त्यांची तयारी आहे. लोणंदचे डॉ. नितीन सावंत, खंडाळ्याचे बंडू ढमाळ, वाईचे काँग्रेसचे विराज शिंदे, अॅड. नीलेश डेरे, माजी उपसभापती अनिल जगताप अशी इच्छुकांची लांबलचक यादी तयार झाली आहे. माजी मंत्री मदनआप्पा पिसाळ यांच्या सूनबाई व माजी जि.प. अध्यक्षा अरूणादेवी पिसाळ यांचेही नाव चर्चिले जात आहे. मात्र, अद्याप त्यांची तयारी दिसत नाही. विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे ना. निंबाळकर यांच्या गटाने शरद पवार गटात प्रवेश केल्याने त्यांचा प्रभाव या मतदारसंघावर राहू शकतो. त्यामुळेच मकरंद पाटील यांच्या विरोधात तगडा उमेदवार येण्याची शक्यता आहे.

फलटण विधानसभा मतदारसंघ राखीव आहे. त्यामुळे या मतदारसंघात उमेदवार कोणीही असले तरी खरी लढाई विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे ना. निंबाळकर व माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर यांच्यातच आहे. रामराजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते होते. मात्र, त्यांचे आमदार दीपक चव्हाण, बंधू संजीवराजे ना. निंबाळकर यांच्यासह कार्यकत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात प्रवेश केल्याने फलटणचे चित्र बदलले आहे. रामराजे तांत्रिकदृष्ट्या महायुतीत असले तरी त्यांनी महायुतीचा प्रचार करणार नसल्याचे सांगितल्याने शरद पवार गटाचे उमेदवार दीपक चव्हाण हेच राहतील. तर ही जागा महायुतीकडून भाजपला जाण्याची शक्यता आहे. रणजितसिंह ना. निंबाळकर यांचे समर्थक सचिन कांबळे- पाटील हे या मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार होवू शकतात. मात्र, खरी लढत ही रामराजे विरूध्द रणजितसिंह अशीच असेल.

माणमध्ये जयकुमार गोरेंविरोधात मविआचा उमेदवार ठरेना

माण विधानसभा मतदारसंघात भाजप तथा महायुतीतून विद्यमान आ. जयकुमार गोरे हेच निवडणूक रिंगणात असतील. मात्र, विरोधकांमधला महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? हे अजूनही निश्चित नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधून गेल्या खेपेला प्रभाकर देशमुख यांनी आमचं ठरलंयं टीमच्या माध्यमातून आ. जयकुमार गोरे यांना तगडी फाईट दिली होती. आता काँग्रेसने हा मतदारसंघ मागितला आहे. त्यामुळे रणजितसिंह देशमुख यांनी या मतदारसंघावर दावेदारी केली आहे. तर गेल्यावेळी आमचं ठरलंय टीममध्ये पुढच्यावेळी खटाव तालुक्याचा उमेदवार असेल, असा निर्णय झाला होता त्यामुळे प्रभाकर घार्गे यांनीही उमेदवारीची दावेदारी केली आहे. अनिल देसाई यांना ऐनवेळी थांबायला लावल्याने त्यांनी सातत्याने शरद पवार यांच्या भेटी घेवून निवडणुकीची तयारी केली आहे. प्रभाकर देशमुख हे पुन्हा एकदा महाविकास आघाडीतून इच्छुक आहेत. या सर्वांमध्ये अभयसिंह जगताप या नव्या चेहऱ्याचाही समावेश झाला असून जगतापांनी आक्रमक प्रचाराला प्रारंभ केला आहे. तर आ. जयकुमार गोरे यांना सातत्याने लढत देणारे त्यांचे बंधू शेखर गोरे यांनी शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटातून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडे ठेवणार की काँग्रेसला सोडणार की उध्दव ठाकरे गटाला देणार त्यातून आ. जयकुमार गोरे यांच्या विरोधात एकास एक उमेदवार देणार की त्यातही नेहमीप्रमाणे फाटाफूट होणार यावर या मतदारसंघाची निर्णायक लढाई होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news