यवतमाळ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात त्यांच्या गड किल्ल्यासाठी दोन हजार कोटी रुपयाचे प्रावधान करून महाराष्ट्राची आर्थिक स्थिती भक्कम करण्यासाठी एक मिलियन डॉलरची तरतूद करण्यात येणार आहे. केंद्र व राज्य शासनामार्फत सुरू असलेल्या लाडकी बहीण, शेतकरी आणि युवकांसह सुरू असलेल्या सर्व योजनांचा निधी वाढवणार असल्याचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले. ते उमरखेड येथे भाजपाचे उमेदवार किसनराव वानखेडे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलत होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी " जय शिवाजी, जय भवानी " नारा देत आपल्या भाषणाला सुरुवात केली. प्रचार सभेत बोलताना त्यांनी काँग्रेसवर घणाघात करताना या विधानसभा निवडणुकीच्या महाभारतात कौरव-पांडव समोरासमोर उभे असून मोदींच्या नेतृत्वातील उमेदवार सत्याच्या बाजूने आहेत तर काँग्रेस आघाडी ही असत्याच्या बाजूने असल्याचे सांगितले. काँग्रेसच्या ७० वर्षाच्या कार्यकाळात त्यांना जे जमले नाही ते मोदी सरकारने करून दाखवले. यामध्ये शेतकरी, युवक यांना रोजगार तसेच महाराष्ट्रातील छत्रपतींसह इतर महामानवांना सन्मान देण्याचे काम केले. राज्यात महायुतीचे सरकार येताच वर्धा-यवतमाळ रेल्वे लाईनच्या कामाला गती देऊन या पाच वर्षात योजना पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची असली शिवसेना नसून फक्त उद्धवसेना राहिल्याची कोपळखरी त्यांनी लगावली. भाजपाचे महायुतीचे सरकार हे राहुल गांधी सारख्या खटाखट खटाखट सारखे नसून जे वचन दिले ते निभवणारे आहे .काँग्रेसचे राज्य असलेल्या प्रदेशात काँग्रेसने दिलेले आश्वासन पूर्ण न केल्यामुळे काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांना जे निभवता येईल एवढेच वचन द्या. असे म्हणावे लागल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय जनता पार्टीने आपल्या वचननाम्यामध्ये जाहीर केलेले सर्व वचने ही सरकार आल्याबरोबर पूर्णत्वास नेणार असल्याचे सांगत गरिबांना राशन दुकानातून गहू, तांदूळ सोबतच ज्वारी, तेल, मीठ, साखर, चटणी अशा जीवनावश्यक वस्तू देणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी मंचावर माजी आमदार उत्तमराव इंगळे, उमरखेडचे उमेदवार किसनराव वानखेडे हदगावचे उमेदवार बाबुराव कदम, आमदार नामदेव ससाने, नितीन भुतडा, महादेव सुपारी, आरती फुफाटे सह महायुती घटक पक्षातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.