वैजापूर: तुमच्याशी गद्दारी करणाऱ्या गद्दाराला गाडायचं म्हणजे गाडायचं, तसेच शिवसेना पक्ष फोडून जाताना फक्त माझाच घात केला नसून वाणी साहेबांच्या विश्वासाचा घात गद्दारांनी केला आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार बोरनारे यांच्यावर नाव न घेता केली.
वैजापूर येथील ठाकरे गटाचे उमेदवार डॉ. दिनेश परदेशी यांच्या प्रचारार्थ वैजापूर येथिल जाहीर सभेत उध्दव ठाकरे बोलत होते. तुम्ही निवडून दिलेला जरी गद्दार झाला असला तरी. तुम्ही मात्र निष्ठेने माझ्यासोबत राहिला. त्याचा मला सार्थ अभिमान आहे. जेव्हा मी मुख्यमंत्रीपद सोडून वर्षा निवासस्थानाहून निघालो होतो. तेंव्हा ते सगळे ग्लास घेऊन नाचणारे गद्दार होते. त्यातील वैजापूरचा देखील हा एक गद्दार होता. जो खोके घेऊन विकला गेला. तो तुमचे भविष्य घडवू शकेल, असे तुम्हाला वाटते का? असा प्रश्न ठाकरेंनी यावेळी केला. वैजापूर विधानसभा मतदारसंघात अनेक जण इच्छुक होते. पण सर्वांनी एकत्र येत गद्दारला पाडायचे असेल तर परदेशींना तिकीट दिले पाहिजे, अशी एकजूट दाखवली. त्यामुळे सर्वांचा अभिमान आहे. आज कापसाचा भाव किती आहे, शेतकरी सुखी आहे का? असे उद्धव ठाकरे म्हणाले.