महाराष्ट्रामध्ये ठाकरे, गडाख ही घराणेशाहीची उदाहरणे नसून आमची वडिलोपार्जित संपत्ती आहे. आम्ही खोके मोजणारे नसून मर्दानी डोके मोजणारे आहोत. अपक्ष आमदार म्हणून संधी असताना, प्रतिकूल परिस्थितीतही आमची खंबीर पाठराखण करणार्या आमदार शंकरराव गडाख यांना आयुष्यात कधीही अंतर देणार नाही, अशी ग्वाही माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिली. आघाडी सरकार आले, तर गडाख यांना महत्त्वाचे खाते देऊन मंत्री करण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली.
महाविकास आघाडीचे नेवासा मतदारसंघातील उमेदवार आमदार शंकरराव गडाख यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ठाकरे बोलत होते. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा झाली.
मागील निवडणुकीनंतर आमदार गडाख यांनी दाखविलेल्या निष्ठेचे कौतुक ठाकरे यांनी केले. महायुतीच्या राज्य तसेच केंद्रीय नेतृत्वावर घणाघाती टीकाही केली. ते म्हणाले, की मी निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने जिथे जिथे जातो, तिथे तिथे निवडणूक आयोगाचे अधिकारी, कर्मचारी आपली तसेच आपल्याजवळील वस्तूंची झडती घेतली जात आहे. अशा प्रकारे त्यांच्याकडून पंतप्रधान मोदी व गृहमत्री शहा यांची झडती का घेतली जात नाही? याबाबत शंका उपस्थित केली. स्वातंत्र्यानंतर तब्बल 70-75 वर्षे अस्तित्वात नसलेले केंद्रीय सहकार खाते निर्माण करून केवळ महाराष्ट्रातील सहकार गिळंकृत करण्यासाठी अमित शहा यांनी ते स्वतःच्या बुडाखाली दाबून धरल्याचा आरोप त्यांनी केला. भविष्यात तुमच्या गूळ, साखरेला अमित शहा यांचे मुंगळे, तसेच मुंग्या लागण्याचा धोका असल्याचे ते म्हणाले.
महाराष्ट्राची अस्मिता असणार्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीत भ्रष्टाचार करण्यापर्यंत या लोकांची मजल गेल्यामुळेच नुसत्या वार्याने पुतळा कोसळल्याची शरमही महायुतीला वाटत नसल्याची खंत ठाकरे यांनी व्यक्त केली. भगव्याला कलंक लावण्याचे काम पंतप्रधान मोदी व शहा करत असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला. महाराष्ट्र लुटता यावा यासाठीच शिवसेना संपविण्याचा घाट घातला गेल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.
राज्यात महाविकास आघाडीचीच सत्ता येणार असल्याचा ठाम निर्धार व्यक्त करून, त्या वेळी राज्यातील शेतकर्यांना परत कर्जमाफी देण्यासह जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवणार, जुनी पेन्शन योजना राबविणार, आशा, अंगणवाडी सेविकांचे पगार वाढवणार असे ठाकरे यांनी या वेळी स्पष्ट केले.
आमदार बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, माजी आमदार पांडुरंग अभंग, ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड, उदयन गडाख, आदींची भाषणे झाली.
तुम्हाला चाळीस गद्दारांनी धोका दिला. आम्हाला दोन गद्दारांनी धोका दिला. महायुतीच्या अडीच वर्षांमध्ये शंकरराव गडाख आणि नेवासा तालुक्याला भाजपने खूप त्रास दिला. महाराष्ट्राच्या भल्यासाठी तुम्ही मुख्यमंत्री व्हावे, असे आमचे आशीर्वाद व जनतेचे स्वप्न आहे, असे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी या वेळी सांगितले.