उल्हासनगर : उल्हासनगर विधानसभेचे भाजपचे विद्यमान आमदार कुमार आयलानी यांचे पहिल्या यादीत नाव न आल्याने समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे त्यामुळे भाजपाच्या अन्य इच्छुकांच्या आमदार बनण्याच्या इच्छांना नवे पंख फुटले आहेत.
कुमार आयलानी यांचे 2009 मध्ये भाजपच्या तिकिटावर पप्पू कलानी यांचा पराभव करून आमदार झाले होते. त्यानंतर 2014 मध्ये त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत असलेल्या ज्योती कलानी यांनी पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी उल्हासनगर भाजपचा जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली होती. 2019 मध्ये त्यांना पुन्हा भाजपकडून उल्हासनगर विधानसभेचे तिकीट मिळाले होते. हे तिकीट देखील त्यांना शेवटच्या यादीत मिळाले होते. तेव्हा त्यांच्यासमोर कलानी परिवारातील भाजपच्या तत्कालीन महापौर पंचम कलानी यांचे आव्हान होते. 2019 मध्ये कुमार आयलानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती कलानी यांचा पराभव करत दुसर्यांदा आमदार होण्याचा मान मिळवला.
मागील अडीच वर्षे सत्ता असतानाही कुमार आयलानी यांनी शहरवासियांवर छाप पडेल असे कोणतेही काम केले नाही. सहा महिन्यापूर्वी एका सर्वे कंपनीने कलानी आणि आयलानी यांची लढत झाल्यास कलानी यांचा विजय होईल असे भाकीत केले होते. त्यानंतर भाजपने ही अन्य विकल्पाचा शोध सुरू केला होता. त्यामुळे भाजपकडून जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, विधानसभा क्षेत्राध्यक्ष जमनु पुरसवानी, राजेश वधारिया, राजू जग्यासी आणि सिंधी साहित्य अकादमीचे महेश सुखरामानी यांचा विकल्प म्हणून भाजप विचार करीत आहे.
कलानी परिवार हा उल्हासनगर भर तुतारी या चिन्हावर म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून निवडणूक लढणार असल्याचे ओरडून सांगत आहे. मात्र सोशल मीडियावर कुठेही तुतारी या चिन्हाचा कलानी परिवाराकडून वापर केला जात नाही. त्यामुळे कलानी हे त्यांच्या खासदार मित्राबरोबर आगळी वेगळी शक्कल लढवत आहेत. उल्हासनगर विधानसभा की भाजपकडून काढून घेण्यात शिवसेना शिंदे गट यशस्वी झाल्यास त्याचे उमेदवार हे कलानी हे असू शकतात, अशी चर्चा राजकीय विश्लेषकांमध्ये आहे. आता खासदार हे त्यांच्या मुख्यमंत्री पप्पांकडे मित्रासाठी काय मागून घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.