

उल्हासनगर : उल्हासनगर विधानसभेचे भारतीय जनता पार्टीचे आमदार कुमार आयलानी यांचे कट्टर विरोधक असलेल्या कलानी परिवाराने विधानसभा निवडणुकीसाठी गोवा येथे झालेल्या मेळाव्यात दंड थोपटले आहेत. यासाठी त्यांनी तब्बल 18 पदाधिकार्यांची कोअर कमिटी जाहीर केली आहे.
1990 पासून 2009 पर्यंत उल्हासनगर विधानसभेची आमदारकी ही कलानी परिवाराच्या ताब्यात होती. 2009 मध्ये भाजप आमदार कुमार आयलानी यांनी कलानीच्या साम्राज्याला सुरुंग लावला. मात्र 2014 मध्ये पप्पू कलानी हे इंदर बठीजा हत्या प्रकरणात येरवडा कारागृहात असताना त्यांच्या पत्नी ज्योती कलानी ह्या राष्ट्रवादी काँग्रेसचा तिकिटावर निवडून आल्या. मात्र 2019 मध्ये पुन्हा एकदा भाजपचे कुमार आयलानी हे आमदार झाले. 2024 ला विधानसभा निवडणुका होणार आहेत. मात्र ज्योती कलानी यांच्या तीन वर्षापूर्वी स्वर्गवास झाला आहे. त्यामुळे कलानी कुटुंबाकडून पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी कालानी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात येणार आहे. ते महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष किंवा अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची संभावना आहे.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कलानी परिवाराकडून गोवा येथे कलानी समर्थकांचा आणि पदाधिकार्यांचा मेळावा भरविण्यात आला. या मेळाव्यात कोअर कमिटीची घोषणा करण्यात आली असून विशेष म्हणजे या कमिटीच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे नेते माजी जिल्हाध्यक्ष डॉ.जयराम लुल्ला यांची निवड करण्यात आली आहे. तर पप्पू कालानी हे मार्गदर्शक असणार आहेत.
ओमी कालानी यांच्या पत्नी पंचम कालानी ह्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्ष आहेत. त्यात अध्यक्ष डॉ. जयराम लुला, मार्गदर्शक पप्पू कलानी, पदाधिकारी नरेंद्र कुमारी ठाकुर, सुमित चक्रवर्ती, पीतू राजवानी, नोनी धामेजा, नरेश दुर्गानी, ओमी कालानी, संजय सिंह चाचा, सत्यन पूरी, राजेश टेकचंदानी, अजीत माखीजानी, मनोज लासी, शिवाजी रगडे, ऍडवोकेट मनीष वाधवा, मोनू सिद्दीकी, संतोष पांडे, पंचम ओमी कालानी, कमलेश निकम, कार्यालय प्रमुख आनंद शिंदे, होशियार सिंह लबाना यांचा समावेश आहे. पहिल्यांदाच कलानी परिवाराने त्यांच्या कुटुंबाच्या बाहेरच्या असलेल्या व्यक्तीवर विश्वास ठेवून अध्यक्ष पदाची जबाबदारी ही जयराम लुल्ला यांच्याकडे सोपवल्याने शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे.