Thane | मतदानाच्या वाढीव टक्क्याने उमेदवारांना भरली धडकी

डोंबिवलीत 15.38 टक्के, तर भिवंडी पूर्वेत 1.31 टक्के वाढले मतदान
Elections
Thane ElectionsFile Photo
Published on: 
Updated on: 
ठाणे : दिलीप शिंदे

राज्याच्या सत्तेची दिशा ठरविणार्‍या ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात 2019 मधील निवडणुकीच्या तुलनेत 1.31 टक्क्यांपासून 15.38 टक्क्यांपर्यंत मतदानाचा भरीव टक्का वाढलेला आहे. मुस्लिम बहुल मतदारसंघ असलेल्या भिवंडी पूर्व मतदारसंघात फक्त 1.31 टक्के, मुंब्रा - कळवा मतदार संघात 1.94 टक्केच मतदान वाढले असताना सर्वाधिक 15.38 टक्के मतदान हे डोंबिवलीत, कल्याण पूर्वमध्ये 14.8 टक्के, भिवंडी ग्रामीण 9.29 आणि लाडक्या बहिणीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडीत 10.65 टक्क्यांनी मतदान वाढलेले आहे. एकंदरीत महिला मतदारांमुळे अपवाद वगळता प्रस्थापितांसह आशावादी उमेदवारांची झोप उडाली आहे.

ठाणे जिल्ह्यात 18 विधानसभा मतदार संघ असून 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत 56.05 टक्के मतदान झाले. सुमारे 39 लाख मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बाजवून 244 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद केले आहे. मतांची वाढलेली टक्केवारी ही नेहमीच सत्तेच्या विरोधात असते. सत्तेवर राग असतो म्हणून लोक बाहेर पडून भरभरून मतदान करतात. असा अनुभव आहे. पण मुख्यमंत्री लाडक्या बहिणी या मतदानाला मोठ्या प्रमाणावर उतरल्याने टक्केवारी वाढलेली दिसून येते. तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील उभी फूट आणि त्यानुषंगाने पक्ष तसेच चिन्हाचा झालेला निर्णय, निष्ठा विरुद्ध गद्दारी तसेच सरकारी योजनांमार्फत पैशांचा पडलेला पाऊस अशी कारणे मतदान वाढीस कारणीभूत असल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रस्थापितांनाही धडकी भरली असून महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची झोप उडाली आहे. मात्र ही मतांची टक्केवारी मुंब्रा-कळवा, भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम सारख्या मुस्लिम बहुल मतदारसंघात फारशी वाढलेली नाही.

कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या डोंबिवली मतदार संघात 56.19 टक्के मतदान झाले असून ही मतांची टक्केवारी मागील निवडणुकीच्या तुलनेत सर्वाधिक 15.38 टक्क्यांनी वाढली आहे. हे वाढीव मतदान कोणाला पोषक आणि कुणाला मारक ठरेल याची चिंता उमेदवारांना सतावू लागली आहे. मंत्री चव्हाण यांना मनसेची आणि ऐनवेळी शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख सदा थरवळ यांनी केलेली मदत ही ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे यांना धक्का होती. बंडखोरीमुळे गाजलेल्या कल्याण पूर्वेत 58.50 टक्के मतदान झाले. मतांची टक्केवारी 14.8 टक्क्यांनी वाढल्याने तिरंगी लढत चुरशीची होईल. कल्याण पश्चिममध्येही 54.75 टक्के मतदान झाले असून मतांचा आकडा 12.85 टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे शिवसेना-मनसे आणि उबाठा यांच्या तिरंगी लढती चुरशीची बनल्याचे स्पष्ट झाले आहे. तोच ट्रेंड कल्याण ग्रामीणमध्ये पाहायला मिळाला. या मतदारसंघात 57.81 टक्के मतदान झाले असून मनसे-शिवसेना आणि उबाठा अशी तिरंगी लढत आहे. 11.29 टक्क्यांनी मतदान वाढल्याने सर्वच उमेदवारांनी देव पाण्यात ठेवले आहेत

भिवंडी ग्रामीणमध्ये ही चौरंगी लढत असून जिल्ह्यातील सर्वाधिक 69.01 टक्के मतदान झालेले आहे. गतवर्षीच्या तुलनेत 9.29 टक्क्यांनी मतदान वाढले आहे. त्याच्या शेजारी असलेल्या शहापूरमध्ये 68.32 टक्के मतदान झाले. यावर्षी मतांची टक्केवारी 2.56 टक्क्यांनी वाढली असल्याने बदल निश्चित असल्याचे बोलले जात आहे. चौरंगी लढतीमुळे माजी मंत्री गणेश नाईक यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या ऐरोलीत 51.5 टक्के मतदान झाले असून तब्बल 8 टक्क्यांनी मतदान वाढलेले दिसून येते.

उल्हासनगरमध्ये मतांची टक्केवारी 7.03 टक्क्यांनी वाढल्याने जिल्ह्यातील सर्वात कमी टक्केवारीचा डाग पुसून काढलेला दिसून येतो. 54 टक्के मतदान झाल्याने मतदार भाजपला तारणार की टांगा पलटी करणार, याची चर्चा रंगू लागली आहे. भाजपच्या अंतर्गत राजकारणामुळे गाजलेल्या मुरबाड मतदारसंघात 64.92 टक्के मतदान झाले असून मागील निवडणुकीच्या तुलनेत 6.39 टक्क्केनी मतदान वाढलेले आहे. भाजप आणि राष्ट्रवादी शरद पक्षात थेट लढाई असली तरी जिजाऊच्या उमेदवाराला मिळणार्‍या मतांवर विजयाचे गणित ठरेल.

कोण बाजी मारणार?

मुस्लिम बहुल मतदारसंघ असलेल्या भिवंडी पूर्व मतदार संघात मतदानाचा फक्त 1.31 टक्का वाढला असून 49.2 टक्के मतदान झालेले आहे. समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख आणि शिंदे गटाचे संतोष शेट्टी यांच्यात लढत आहे. लोकसभेत याच मतदारसंघातील आघाडीमुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बाळ्यामामा म्हात्रे विजयी झाले होते. तसेच भिवंडी पश्चिमध्येही फक्त मतांचा टक्का 3.76 टक्क्यांनी वाढलेला आहे. 54.1 टक्के मतदान झाले असून भाजपचे महेश चौगुले हे गड राखतात की काँग्रेस बाजी मारते, याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत असलेल्या मुंब्रा-कळवा मतदार संघात फक्त 1.94 टक्केच मतदान वाढलेले आहे. महायुतीने नजीब मुल्ला यांच्या रूपाने मुस्लिम उमेदवार देऊन आमदार जितेंद्र आव्हाड यांना कोंडीत गाठले होते. मतदारसंघात 52.01 टक्के मतदान झाले असून लोकसभेत आव्हाड यांनी 65 हजारांचे मताधिक्य मिळवून दिले होते. बहुतेक त्याच दिशेने मतदारांनी मतदान केल्याने महायुतीच्या उमेदवारांची चिंता वाढलेली दिसून येते.

उमेदवारांची चिंता वाढली...

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या ठाणे विधानसभा मतदार संघातील तिरंगी लढतीमुळे 6.25 टक्क्यांनी मतदान वाढलेले आहे. 59.01 टक्के मतदान झाल्याने भाजपचे संजय केळकर, मनसेचे अविनाश जाधव आणि उबाठाचे राजन विचारे यांना चिंता सतावू लागली आहे. शिवसेनेतील अंतर्गत नाराजी आणि मनसेचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला दिलेल्या पाठिंब्यामुळे गाजलेल्या अंबरनाथ मतदार संघात 47.75 टक्के मतदान झाले आहे. 5.29 टक्क्यांनी मतदान वाढल्याने दोन्ही शिवसेनेच्या उमेदवारांची चिंता वाढलेली दिसून येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news