

सुनील कदम, कोल्हापूर
विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीचे सूर जुळले असले तरी अनेक मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाआघाडीच्या स्थानिक नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये संशयकल्लोळ असल्याचे दिसून येत आहे. मित्रपक्षांतील स्थानिक कार्यकर्ते मनापासून आपलेच काम करतील की ‘आत एक बाहेर एक’ असा खेळ खेळतील, अशी धास्ती दोन्हीकडच्या उमेदवारांमध्ये दिसून येते. हा स्थानिक बेबनाव दूर करताना उमेदवारांची मात्र कसोटी लागताना दिसत आहे.
राज्यात अशा अनेक जागा आहेत की, ज्या जागांवर महायुतीतील भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांनी दावा केलेला होता. महाआघाडीच्या जागावाटपातही अशीच स्थिती आहे. शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्या जागावाटपातही जोरदार रस्सीखेच झालेली होती. काही जागांबाबत शेवटपर्यंत समझोता न झाल्याने काही ठिकाणी महायुती आणि महाआघाडीत मैत्रीपूर्ण लढती होत आहेत; तर अनेक ठिकाणी उघड बंडखोरी झालेली आहे.
अनेक मतदारसंघांतील स्थानिक कार्यकर्त्यांना समझोता मान्य नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी महायुती आणि महाआघाडीच्या उमेदवारांच्या मित्रपक्षांचे नेते आणि कार्यकर्ते निवडणूक प्रचार मध्यावर आला, तरी अजूनही प्रचारात सक्रिय झालेले दिसत नाहीत. काही मतदारसंघांमध्ये तर मित्रपक्षाच्या नेते-कार्यकर्त्यांनी विरोधकांची तळी उचलून धरलेली दिसते. ज्या ज्या मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीत उघड बंडखोरी झालेली आहे, तिथे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आपापल्या राजकीय सोयीनुसार आणि स्थानिक पातळीवरील संबंधानुसार एकमेकांच्या प्रचारात सक्रिय झालेले दिसत आहेत. महायुती किंवा महाआघाडीच्या माध्यमातून राज्यपातळीवर जरी नेते एकत्र आले असले, तरी अनेक मतदार संघांमध्ये स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये वर्षानुवर्षांपासून असलेली खुन्नस काही सर्वार्थाने संपलेली दिसत नाही. महायुती आणि महाआघाडीच्या स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये आजही एकमेकांना ‘बघून घेण्याची’ खुन्नस मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्यामुळे या परस्परविरोधी गटाच्या कार्यकर्त्यांची मोट बांधताना उमेदवारांची मात्र कसोटी लागत आहे. ‘दादा, बाबा, नाना, काका, भाऊ, बापू’ म्हणून कार्यकर्त्यांना प्रचाराला लावताना बहुतेक उमेदवारांच्या नाकीनऊ येताना दिसत आहे.
कोल्हापूर उत्तरमध्ये सुरुवातीला राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जोरदार विरोध करणार्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर आता लाटकरांचा प्रचार करण्याची वेळ आली आहे. वाळव्याचे जयंत पाटील यांचे कधीही स्थानिक काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांशी फारसे सख्य नाही. त्यामुळे इथेही महाआघाडीत बेबनाव दिसून येतो आहे. असेच चित्र अनेक मतदारसंघांमध्ये दिसते.
मराठा आरक्षणाला ओबीसींतून हरकत घेणार्या छगन भुजबळांना महायुतीचे मराठा कार्यकर्ते मदत करणार का हा सवालच आहे. याच मुद्द्यावरून मराठा समाज नीलेश आणि नितेश राणे यांनाही घेरू शकतो. परप्रांतीय उमेदवार हा मुद्दा मुंबईतील काही उमेदवारांना अडचणीचा ठरू शकतो. महायुती आणि महाआघाडी अशा दोन्ही बाजूंच्या अनेक उमेदवारांपुढे स्थानिक पातळीवर एकसमानच अडचणी असल्याच्या दिसतात.