

नाशिक (सिन्नर) : पुढारी ऑनलाइन डेस्क - उदय सांगळे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची सिन्नरमध्ये बुधवार (दि.13) रोजी जाहीर सभा पार पडली. काठी आणि घोंगडी देऊन शरद पवार यांचे यावेळी जंगी स्वागत करण्यात आले. उदय सांगळे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे. सांगळे यांच्या उमेदवारीने अजित दादा गटाचे माणिकराव कोकाटे यांच्यासमोर मोठे आव्हान असून येथे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे.
सिन्नर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये लढत होणार आहे. अजित पवार गटाचे आमदार माणिक कोकाटे यांना शह देण्यासाठी शरद पवार गटाने उदय सांगळे यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे येथील लढत चुरशीची होणार आहे.
सिन्नर लोकसभा निवडणुकीत सांगळे यांनी खासदार वाजे यांना सहकार्य केले होते. त्याची परतफेड विधानसभेतून केली जात असल्याचे मानले जात आहे. जितेंद्र आव्हाड यांनी सांगळे यांना शरद पवार गटाकडे आणण्यासाठी प्रयत्न केले होते. उदय सांगळे यांच्या उमेदवारीतून शरद पवार यांनी मराठा आणि ओबीसी मतांची मोट बांधण्याचे नियोजन या निवडणुकीतून केले आहे. सिन्नरमध्ये मराठा आणि वंजारी मतदारांची संख्या मोठी आहे. खासदार वाजे हे मराठा समाजाचे आहेत. त्यांच्या मदतीने हे समीकरण जुळवून आणण्याची तयारी करण्यात आली होती