
रत्नागिरी : निष्ठावंत म्हणून ज्या बाळ मानेंसाठी २०१४ ला उदय सामंत यांच्या भाजप प्रवेशाला विरोध केला, पक्षाच्या युवामोर्चाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष केले, जिल्हाध्यक्षपद दिले, झुकते माप देत काय नाही केले. स्वा. सावरकरांच्या विचारांना तिलांजली देणार्यांबरोबर जाणार्या बाळ मानेंना कोणतेही सहकार्य करू नका. आपल्या विचारांशी गद्दारी करणार्या बाळ मानेंना त्यांची जागा दाखवून द्या, असे स्पष्ट आवाहन सार्वजनिक बांधकाममंत्री आणि भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांनी केले.
येथील स्वयंवर मंगल कार्यालयात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं महायुतीच्या समन्वयाच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी महायुतीचे रत्नागिरी विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे उमेदवार उदय सामंत, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, राजापूरचे शिवसेनेचे उमेदवार किरण ऊर्फ भैया सामंत, अॅड. दीपक पटवर्धन, जयसिंग घोसाळे, अॅड. बाबा परुळेकर, भाजपा तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे व दादा दळी, शिल्पा मराठे, वर्षा ढेकणे, शिवसेना महिला जिल्हा संघटक शिल्पा सुर्वे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी रवींद्र चव्हाण म्हणाले, महायुती म्हणून आपण एकदिलाने काम केले पाहिजे. मनात एक, ओठावर एक आणि करायचे एक हे महायुतीने कधी केले नाही. पटलं नाही तर थेट त्यावर टीका केली जाईल. त्यामुळे मागे काय झाले, याचा विचार न करता एका विचाराने आपल्याला पुढे जायचे आहे. महाविकास आघाडीच्या सरकारने अडीच वर्षांमध्ये काय केले, हे सांगण्याची गरज नाही. राज्याच पुरता विकास त्यांच्या काळात खुंटला; परंतु आता महायुतीचे सरकार आल्यानंतर पाहा विकासकामांचा सपाटा लावला आहे. राज्यात विकास होत आहे. कोणालाही वार्यावर सोडलेले नाही. सर्वसामान्यांचे हे सरकार आहे. प्रत्येक प्रश्नाला न्याय देऊन अनेक हिताचे निर्णय घेतले. प्रत्येक पक्षाची ताकद कमी-जास्त ठिकाणी असू शकते; परंतु आपली सर्वांची एक वज्रमूठ ठेवा, असे आवाहन चव्हाण यांनी केले.
पक्षांतर्गत किंवा व्यक्तिगत जे मतभेद असतील ते 20 तारखेपर्यंत बाजूला ठेवा. जिल्ह्यातील महायुतीचे सर्व आमदार निवडून आणणे हे महत्त्वाचे आहे. कोणताही वेगळा अर्थ लावू नका किंवा आपल्याला डावलले आहे हे मनातून काढा. महायुती सरकार यावे यासाठी जोमाने काम करा. भाजपशी गद्दारी करणार्या आणि स्वार्थी भूमिका घेणार्या बाळ मानेंना सहकार्य करू नका, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.