नागपूर : भाजपचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिवाळीच्या दिवशीही त्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या देवगिरीवर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत बंडखोरांची समजूत घालण्यात व्यस्त असताना त्यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानी मात्र सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. या संदर्भात स्वतः फडणवीस यांना विचारले असता त्यांनी याबाबत तुम्ही पोलिसांनाच विचारा असे उत्तर दिले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक पार्श्वभूमीवर ही सुरक्षा वाढ करण्यात आली आहे. एसआयडीकडे मिळालेल्या इनपुटनुसार ही सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. स्वतः फडणवीस नागपुरातील दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या काळात त्यांच्या निवासस्थानी राज्यभरातून भेटणाऱ्यांची गर्दी लक्षात घेता ही सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. आधीच झेड सिक्युरिटी असलेल्या गृहमंत्री फडणवीस यांच्या सुरक्षेत आता अधिक खबरदारी घेतली जात आहे.