शरद पवारांवरील वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांना उपरती; दिलगिरी व्यक्त

Sadabhau Khot on Sharad Pawar | सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर खालच्या भाषेत टीका
Sadabhau Khot on Sharad Pawar
भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली होती.(Image source-X)
Published on: 
Updated on: 

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sadabhau Khot on Sharad Pawar) यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली होती. सदाभाऊ खोत यांनी माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने केली होती. त्यानंतर आता सदाभाऊ खोत यांना त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून उपरती झाली आहे. सदाभाऊ खोत यांनी एक व्हिडिओ जारी करत त्यांनी केलेल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली आहे.

''माझी गावगाड्याची भाषा आहे. पण काही लोकांनी माझ्या बोलण्याचा विपर्यास केला. यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेतो. मी दिलगिरी व्यक्त करतो.'' असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.

Maharashtra politics : काय म्हणाले होते सदाभाऊ खोत?

जत (जि. सांगली) येथील प्रचार सभेत बोलताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्याबाबत खालच्या भाषेत वक्तव्य केले होते. त्यांनी यावेळी एकेरी भाषेचा वापर केला होता. यामुळे वादाला तोंड फुटले. ''पवारसाहेबांच्या चिल्ल्यापिल्ल्यांनी कारखाने हाणले, बँका, सूत गिरण्या हाणल्या. आता म्हणतायेत की, मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचाय, कसला चेहरा? तुम्हाला तुमच्या चेहऱ्यासारखा पाहिजे का?'' अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी पवारांवर टीका केली होती.

'हे खपवून घेणार नाही...' अजित पवारांचा थेट सदभाऊ खोत यांना फोन

शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर अजित पवार यांनी सदाभाऊ खोत यांच्याबद्दल संताप व्यक्‍त केला. याबाबत आपण सदाभाऊ खोतांना फोन करून बोललो असल्याचे अजित पवारांनी सांगितले. ''ज्येष्ठ नेते पवार साहेब यांच्याविषयी सदाभाऊ खोत यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत चुकीचे व निंदनीय आहे. अशा पद्धतीने खालच्या पातळीवर पवार साहेबांवर वैयक्तिक टीका करणे आम्हास पूर्णपणे अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि वैयक्तिकरित्या मी या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध करतो. यापुढे पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही'', असे अजित पवार यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

Sadabhau Khot on Sharad Pawar
शरद पवारांवरील जहरी टीका, अजित पवारांचा थेट सदाभाऊंना फोन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news
ताज्या बातम्या