तुळजापूर : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार व भाजपाचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांनी २.० ची लढाई ३६८७९ मतांच्या फरकाने जिंकली. मागच्यावेळी सरकार आ. पाटील स्थापनेच्यावेळी झालेल्या आमदार फोडाफोडीच्या राजकारणात त्यांना मंत्रिपदापासून दूर राहावे लागले. यंदा त्यांच्यासाठी दुग्धशर्करा योग चालून आला आहे.
धाराशिव जिल्ह्यात भाजपाचे एकमेव आमदार आणि राज्यात भाजपाला विधानसभा निवडणूकीत मिळालेले घवघवीत यश आमदार राणादादांना मंत्री होण्यास कुणीच कोणीच रोखू शकत नाही अशी परस्थिती आहे. त्यांच्या रूपाने पाच-सहा वर्षांनंतर तुळजापूर तीर्थक्षेत्राला लाल दिवा मिळणार आहे. मंत्रीपदाबरोबर धाराशिवच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दुसऱ्यांदा त्यांच्यावर सोपविली जावू शकते. एकेकाळी ज्या तुळजापूर तालुक्यात भाजपाला सत्तेचा कुठलाही लवलेश नव्हता. त्या तालुक्यात नगर परिषद, पंचायत समिती, खरेदी विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती, दूध संघ अनेक ग्रामपंचायत, विकास सोसायट्या अशा विविध संस्थांवर भाजपाचे प्राबल्य निर्माण करण्यात आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. तालुक्यात कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची मोठी फळी निर्माण करण्यातही त्यांनी चांगले योगदान दिले आहे.
तुळजापूर तालुका प्रारंभीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला असताना यंदाच्या विधानसभा निवडणूकीत पक्षातील ज्येष्ठ, कनिष्ठ नेते, कार्यकत्यांची एकजूट दिसून आली नाही, एवढेच काय महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांनी आघाडीचे धर्म इमान इतबारे न पाळल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार अॅड. कुलदीप ऊर्फ धीरज अप्पासाहेब पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले. अॅड. पाटील यांचा पराभव पक्षाच्या निष्ठावान कार्यकत्यांच्या जिव्हारी लागणाराच ठरला आहे.
यावेळी काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी एका तरुण, नवख्या, धडाडी कार्यकर्त्याला उमेदवारी देवून निवडणूक लढविण्याची संधी दिली. त्याचे चीज होताना दिसत असताना सलग पंधरा ते वीस वर्षे आमदार म्हणून तालुक्याचे नेतृत्व केलेल्या मधूकरराव चव्हाण यांनी निवडणूक प्रचारातून काढता पाय घेतला. परिणामी पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले अशी चर्चा मतदारांमध्ये रंगू लागली आहे.
गेल्या काही वर्षात पक्षाच्या जीवावर मोठे झालेले असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी पक्षापासून दूर गेले तरीही न डगमगता पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या अॅड. पाटील यांनी मिळविलेले ९४,९८४ मतांचे मताधिक्य नजरेआड करून चालणार नाही. त्यामुळे पराभूत होवूनही सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन करण्यात अॅड. पाटील नक्कीच यशस्वी ठरले आहेत.