
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा: महायुतीचे उमेदवार राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सोमवारी (दि. २८) प्रचंड शक्तिप्रदर्शन करत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी पक्षाचे झेंडे, भगवे झेंडे, भगव्या टोप्या, भगव्या साड्या अन् टी शर्ट, भगवे फुगे यामुळे दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय हा रस्ता भगवामय झाला होता. जणू रस्त्यावर भगवे वादळ अवतरले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राजेश क्षीरसागर यांचे कटआऊट घेतलेले कार्यकर्ते घोषणांनी परिसर दणाणून सोडत होते.
राजेश क्षीरसागर म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कोल्हापूरसाठी शेकडो कोटींचा निधी आणला. गेले ३० वर्षे झगडणाऱ्या महापालिकेतील ५०७ रोजंदार कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केले. त्यापैकी तब्बल ३२० कर्मचारी मागासवर्गीय आहेत. त्यामुळे गेल्या निवडणुकीत माझ्यावर काँग्रेसने खोटा आरोप केला होता, हे मी सिद्ध केले आहे. गेली पाच वर्षे न थकता लोकांची कामे करत आहे. आता साथ द्या. पुढील पाच वर्षे सेवा करण्याची संधी द्या, असे आवाहनही क्षीरसागर यांनी केले.
खासदार धैर्यशील माने म्हणाले की, राजेश क्षीरसागर यांनी गेल्या अडीच वर्षांत कोल्हापूर शहराच्या विकासाला चालना देण्याचे काम केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिला भगिनींना दर महिन्याला ओवाळणी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी क्षीरसागर यांना आमदार करून विधानसभेत पाठवा. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकवा.
खासदार धनंजय महाडिक म्हणाले की, महायुतीकडून राजेश क्षीरसागर यांचे नाव जाहीर होताच काँग्रेसच्या तंबूत खळबळ उडाली. निष्ठावंतांना डावलून कुणालाच पसंत नसलेल्याला उमेदवारी दिल्याने काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी उमेदवार बदलण्याची मागणी केली. काँग्रेसमध्ये हुकूमशाही असल्यानेच असे घडत आहे. त्यापेक्षा महायुतीत शिवसेनेकडून एकनिष्ठ असलेल्या क्षीरसागर यांना उमेदवारी मिळाली. क्षीरसागर यांना मत म्हणजे लाडक्या बहिणींना दर महिन्याला ओवाळणी देणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मत मिळणार आहे. २० ऑक्टोबरला मताच्या रूपाने क्षीरसागर यांना ओवाळा. मुख्यमंत्री शिंदे प्रत्येक महिन्याला ओवाळणी देतील, असेही महाडिक यांनी सांगितले.
यावेळी भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुजित चव्हाण, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) शहराध्यक्ष आदील फरास, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष सोमनाथ घोडेराव, शिवाजी जाधव आदींसह इतर उपस्थित होते.