पुढारी ऑनलाईन डेस्क : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने मोठा निर्णय घेत शेवटच्या क्षणी उमेदवारच बदला आहे. राजेश लाटकर यांना दिलेल्या उमेदवारीवरुन पक्षात असंतोष निर्माण झाल्याने त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. आता त्यांच्या जागी मधुरिमा राजे मालोजीराजे छत्रपती यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्या उद्या, मंगळवारी (दि.29) अर्ज दाखल करणार आहेत. (Kolhapur North Vidhan Sabha Election)
महाविकास आघाडीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने गुरूवारी (दि.२४) पहिली यादी जाहीर केली होती. यामध्ये कोल्हापूर दक्षिणमधून ऋतुराज पाटील व हातकणंगलेमधून आ. राजूबाबा आवळे यांना पुन्हा दुसर्यांदा उमेदवारी दिली. त्यांनतर कोल्हापूर उत्तरकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यादरम्यान काँग्रेसने त्यांच्या दुस-या यादीत कोल्हापूर उत्तरचे उत्तर देत राजेश लाटकर यांना उमेदवारी घोषित केली.
पण या निवडीनंतर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातातील नाराजी उफाळून आली. जिल्हा काँग्रेस भवनावर दगडफेक करण्याचा प्रकार घडला. यामुळे महाविकास आघाडी अंतर्गत बंडखोरांची नाराजी दूर करण्याचे कडवे आव्हान निर्माण झाले. त्यातच उमेदवार बदलण्यासाठी फेरविचार करावा अशी मागणी पक्षाच्या 26 माजी नगरसेवकांनी जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्याकडे रविवारी केली. याबाबत त्यांनी निवेदनही दिले. अखेर फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेला अवघा एक दिवस शिल्लक असताना सोमवारी उत्तर मधील काँग्रेसचा उमेदवार बदलण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.