

धुळे : महाराष्ट्रातील सरकार लोकनियुक्त निवड झालेली नसून त्यांनी सत्ता बळजबरीने हस्तगत केली आहे. चांगले काम करणारी सरकार पाडून तसेच पक्षांमध्ये फोडाफोडीचे राजकारण करून भारतीय जनता पार्टी सत्तेत बसली आहे. मात्र त्यांचे हे राजकारण जनता कधीही सहन करणार नाही. येणाऱ्या निवडणुकीत जातीयवादी राजकारण करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल, असा विश्वास समाजवादी पार्टीचे अध्यक्ष खासदार अखिलेश यादव यांनी धुळ्यात केले.धुळे येथे जेल रोडवर शनिवारी (दि.19) परिवर्तन संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेस समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी, खासदार ईकरा हसन चौधरी, उमेदवार इर्शाद जहागीरदार तसेच जमील मंसूरी, अकील अन्सारी, गुड्डू काकर, साबीर शेख, कैलास चौधरी, नरेंद्र चौधरी, महेंद्र शिरसाठ, आमदार रईस शेख, आमदार नाइद हसन यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
या सभेत बोलताना अबू आजमी म्हणाले, समाजवादी पार्टी गेल्या अनेक वर्षांपासून जातीयवादी प्रवृत्ती बरोबर लढत आहे. आमच्या पक्षाने कधीही सौदा केला नाही. हिंदू आणि मुस्लिमांना वेगवेगळे करण्याचे काम केले नाही. मात्र भारतीय जनता पार्टी या दोन्ही भावंडांमध्ये फूट पाडण्याचे काम करते आहे. इस्लामने नेहमी मुस्लिम नसलेल्या शेजाऱ्याची रक्षण करण्याचा संदेश दिला आहे. मात्र भारतीय जनता पार्टी द्वेशाचे राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्या होते आहे .मात्र सरकार त्याकडे लक्ष देत नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास शेतकरी शेतमजूर आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिहादचा अर्थ आत्माला सुधारणे असा आहे. हा पवित्र शब्द आहे. मात्र भारतीय जनता पार्टीचे काही नेते जिहादच्या शब्दावरून गैरसमज पसरवण्याचे काम करत असल्याची टीका देखील यावेळी आझमी यांनी केली.
खासदार ईकरा हसन चौधरी यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर देशाचे राजकारण अवलंबून असल्याचे सांगितले. भाजपाकडे विकासाचा कोणताही अजेंडा नाही. केवळ जातीयवाद करून विकासापासून लक्ष विचलित करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. यानंतर बोलताना अखिलेश यादव यांनी सांगितले की, भारत हा जगात सर्वश्रेष्ठ आणि सुंदर असा देश आहे. या देशात सर्व जाती मिळून गुन्या गोविंदाने हजारो वर्षांपासून राहत आहेत. जगात भारताची हीच खरी ओळख आहे. या देशाने बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाला सामावून घेण्याचे काम केले. या देशातील बंधुभाव हाच खरी ओळख आहे. स्वामी विवेकानंद हे देखील अमेरिकेत बोलत असताना त्यांनी भारतीय धरतीचा गौरव केला. पण आज भारतीय जनता पार्टी द्वेष पसरवत आहेत. उत्तर प्रदेशात ज्या बुलडोझरच्या माध्यमातून गरिबांचे घर उध्वस्त करून घाबरवण्याचे काम केले जाते. त्याच बुलडोझर वरून धुळ्यात पुष्पवृष्टी करण्यात आली. धुळेकर जनतेने द्वेषाला फुलांचा वर्षाव करून उत्तर दिले आहे, अशी टीका देखील त्यांनी केली.
भारतीय जनता पार्टीने चांगले दिवस आणण्याचा केवळ स्वप्न दाखवले. मात्र सध्या भारत हा गरिबीमध्ये पहिल्या पाच देशांमध्ये आहे. ही लाजिरवाणी गोष्ट आहे .असे त्यांनी सांगितले. यावेळी पत्रकारां समवेत संवाद साधत असताना त्यांनी सांगितले की, हरियाणा मध्ये झालेली चूक महाराष्ट्रात होऊ देणार नाही. जातीयवादी सरकार आणि प्रवृत्ती थांबण्यासाठी महाविकास आघाडी गटबंधन हाच खरा पर्याय आहे, असे त्यांनी सांगितले