

प्रमोद चुंचूवार, मुंबई
राज्याच्या राजकारणातील दिग्गज शरद पवार यांच्या निवृत्तीच्या संकेताने राजकारणात खळबळ माजली आहे. बारामती या बालेकिल्ल्यातच पवारांनी ही घोषणा केल्याने त्यांच्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. महायुती सरकारमध्ये सामील होण्यासाठी अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. त्यानंतर पक्ष आणि चिन्ह यावरही त्यांनी मालकी निवडणूक आयोगाच्या निकालाच्या माध्यमातून सिद्ध केली.अजित पवार हे शरद पवारांसोबत त्यांच्या पक्षात असतानाच त्यांच्यानंतर पक्षाचा वारसा कुणाकडे, यावरून पक्षात सत्तासंघर्ष सुरू होताच. सुप्रिया सुळे यांना पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्त करण्यात आल्यानंतर व त्यांना महाराष्ट्राचे प्रभारी बनविल्यानंतर शरद पवारांच्या नंतर पक्षाची सूत्रे त्यांच्या हाती जातील, हे स्पष्ट झाले. त्याचवेळी भाजपकडून अजित पवार यांच्यावर सोबत येण्यासाठी विविध यंत्रणांच्या माध्यमातून दबाव टाकला जात होता. अखेर अजित पवार हे भाजपसोबत गेले. यानंतर दोन्ही पवारांमधील संघर्ष एका वेगळ्या पातळीवर पोहोचला.
लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आपली पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देऊन हा संघर्ष एका टोकाला नेण्याचे काम अजित पवारांनी केले. पराभवानंतर ही आपली चूक होती, असे सांगून प्रतिमा संवर्धनाचा प्रयत्न त्यांनी करून पाहिला; मात्र त्यात त्यांना फार यश आले नाही. राजकीय रणनीतीत एकाहून एक मास्टर स्ट्रोक खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शरद पवारांनी लेकीला विजयी करून अजित पवारांना पुन्हा एकदा चितपट करण्यासाठी युगेंद्र पवार यांना रिंगणात उतरविले आहे. आपल्याला आव्हान देणार्या पुतण्याच्याविरोधात त्या ‘पुतण्याचाच पुतण्या’ उभा करण्याचा मास्टर स्ट्रोक पवारांनी खेळला आहे. अजित पवारांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांचा मुलगा युगेंद्र यांना रिंगणात उतरवून पवारांनी एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. एकीकडे पवार कुटुंबात अजित पवार यांना एकटे पाडण्यात ते यशस्वी झाले, तर दुसरीकडे अजित पवारांना घरातूनच तगडे आव्हान दिले जाईल, याची सोय त्यांनी केली.
अजित पवार यांच्याऐवजी तरुण चेहरा व नवे नेतृत्व यांची बारामतीला गरज असल्याची बाब अधोरेखित केली. एका अर्थाने आता पुढील 25 ते 30 वर्षे युगेंद्र पवार यांच्याकडे बारामती सोपवा, असे आवाहनच त्यांनी मतदारांना केले.
मंगळवारच्या सभेत बोलताना निवृत्तीचे संकेत देणे ही पवारांची अशीच एक विचारपूर्वक खेळलेली खेळी असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पक्षाच्या अध्यक्ष पदावरून निवृत्तीची घोषणा करून त्यांनी असाच एक डाव टाकला होता. अजित पवार तेव्हाही मंचावरून पवार यांच्या निर्णयाचा आदर करा, असे सांगून त्यांच्या निवृत्तीचे समर्थन करतानाच दिसले; मात्र अध्यक्ष पदावरून त्यांनी निवृत्त होऊ नये, म्हणून पक्षात भावनिक आवाहने व आंदोलने करण्यात आली. त्यानंतर त्यांनी निर्णय फिरविला; मात्र ही घोषणा करून पक्षाचे सामान्य कार्यकर्ते आपल्यासोबत असल्याचा संदेश त्यांनी अजित पवारांनाही दिला होता. बारामतीतून निवृत्तीचे संकेतही अशीच एक राजकीय व भावनिक खेळी आहे. पवार आता निवृत्त होत आहेत, तर त्यांना निराश व्हावे लागेल, असे आपण काहीही करू नये, अशी भावना बारामतीतील मतदारांच्या मनात निर्माण करणे व या माध्यमातून अजित पवारांचा पराभव घडवून आणणे, हा पहिला हेतू यामागे आहे. या संकेतांचा परिणाम राज्यभरात शरद पवार आणि त्यांची राष्ट्रवादी यांच्यावर प्रेम करणार्या सामान्य जनता आणि पक्षाचे कार्यकर्ते यांच्यावरही होणार आहे.
सक्रिय राजकारणातील पवारांच्या शेवटच्या निवडणुकीत त्यांना पराभूत होऊ द्यायचे नाही, या जिद्दीने कार्यकर्ते कामाला लागू शकतात. गेल्या निवडणुकीच्या वेळेस त्यांच्या पावसात भिजत घेतलेल्या सभेचा जसा मानसिक परिणाम झाला, तसा परिणाम पवारांच्या या निवृत्तीच्या संकेताचा होऊ शकतो. शरद पवार आणि बारामती हे समीकरण जवळपास 6 दशके राजमान्यता पावलेले आहे. त्यांच्याविरोधात या मतदारसंघात कुणीही निवडून येऊ शकत नाही, असे चित्र आहे. आता मी निवडणूक लढणार नाही, असे सांगणार्या पवारांनी स्वतः पुढील दीड वर्षे मी खासदार आहे, हेही स्पष्ट केले. ते पुन्हा निवडणूक लढणार नाही म्हणत असले, तरी राजकारणात दीड वर्षे हा मोठा कालखंड ठरतो. जनतेच्या, पक्षाच्या आग्रहामुळे इच्छा नसतानाही मला निवडणूक लढवावी लागली, असे सांगून ते पुन्हा निवडणूक लढूच शकतात. त्यामुळे निवृत्तीच्या घोषणेमागे पवारांची भावनिक खेळी आणि राजकीय डावपेच आहेत, यात काही शंका नाही.