

पुणे : पुढारी वृत्तसेवा
महापरिवर्तन महाशक्तीच्या वतीनं पुण्यात राज्यातील दहा जागांची यादी जाहीर केली. या यादीत प्रहार जनशक्तीचे बच्चु कडू यांचा समावेश आहे.
पुण्यात महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संभाजीराजे, प्रहार जनशक्तीचे बच्चु कडू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत आपल्या यादीची घोषणा केली. यावेळी स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव, प्रहारचे अनिल चौधरी आदी उपस्थित होते.
यावेळी संभाजीराजे म्हणाले की, महाराष्ट्रात निवडणुकांचे वातावरण तापू लागलं आहे. आज महापरिवर्तन महाशक्तीची बैठक झाली. आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.आमच्याकडे येणाऱ्या विस्थापितांची मोठी यादी आहे. पण प्रस्थापित देखील उमेदवारीसाठी मोठ्या संख्येने आम्हाला संपर्क करत आहेत.
राजू शेट्टी म्हणाले की, परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून एक सक्षम आणि दणकट पर्याय आम्ही महाराष्ट्रातील जनतेसमोर ठेवत आहे. राज्यात जे राजकारण सुरू आहे, ते टोळी युद्ध सुरू आहे. आम्हाला महराष्ट्र स्वच्छ करायचा आहे, साफ करायचा आहे. शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्राची राजकीय प्रगल्भता आणि संस्कृती लयाला गेली आहे. ती पुन्हा प्रस्थापित करायची आहे, असा निर्धार परिवर्तन महाशक्तीने केला आहे.
बारामतीतही आम्ही उमेदवार देणार आहोत. शिरोळ आणि मिरज या दोन मतदार संघात इच्छुकांची संख्या जास्त असल्याने तिथल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करुन नावे जाहीर केली जातील. स्वच्छ चारित्र्य, आणि स्वच्छ हात ही आमची उमेदवारी देण्याची अट आहे.
बच्चु कडू म्हणाले की, इतर पक्षांसारख्या आम्ही वेगवेगळ्या यादी जाहीर करत नाहीत. आम्ही सर्वजण एकत्र येऊन यादी जाहीर करत आहोत. राजकीय संस्कृती लयाला गेली आहे. ती पुन्हा रुजवायची आहे. म्हणून एक सक्षम पर्याय म्हणून आम्ही एकत्रित आलो आहोत.
परिवर्तन महाशक्तीच्या विधानसभा निवडणूक सुकाणू समितीच्या बैठकीत समन्वयक म्हणून महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे धनंजय जाधव, तर सहसमन्वयक प्रहार जनशक्तीचे गौरव जाधव तर स्वाभिमानी पक्षाचे योगेश पांडे या तिघांच्या नावाची निवडणूक समन्वयक म्हणून अधिकृत घोषणा करण्यात आली.
१) ओमप्रकाश उर्फ बच्चू बा. कडू
मतदार संघ
४२ - अचलपूर
प्रहार जनशक्ती पक्ष
२) अनिल छबिलदास चौधरी
११ - रावेर यावल
प्रहार जनशक्ती पक्ष
३) गणेश रमेश निंबाळकर
११८ - चांदवड
प्रहार जनशक्ती पक्ष
४) सुभाष साबणे
९० - देगलूर बिलोली (SC)
प्रहार जनशक्ती पक्ष
५) अंकुश सखाराम कदम
१५० - ऐरोली
महाराष्ट्र स्वराज्य पक्ष
६) माधव दादाराव देवसरकर
८४ - हदगाव हिमायतनगर
महाराष्ट्र स्वराज्य पक्ष
७) गोविंदराव सयाजीराव भवर
९४ - हिंगोली
महाराष्ट्र राज्य समिती
८) वामनराव चटप
७० - राजुरा
स्वतंत्र भारत पक्ष