नवी दिल्ली : महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक हारण्याच्या भितीने भारतीय जनात पार्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून फेक नेरेटिव्ह पसरवत आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला. भाजप हा आरक्षण आणि संविधान विरोधी पक्ष आहे. राहुल गांधी यांच्या एका विधानाची तोडफोड करून फेक नेरेटिव्ह पसरवण्याचा भाजपचा प्रयत्न महाराष्ट्रात चालणार नाही, असेही नाना पटोले म्हणाले.
राजधानी दिल्लीत काँग्रेसच्या छाननी समितीची आणि केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली. छाननी समितीच्या बैठकीनंतर नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पार्टीने लोकशाही आणि संविधान धाब्यावर बसवले असून आरक्षण संपवणारा पक्ष असा शिक्काच त्यांच्या माथ्यावर पडलेला आहे. २०१४ मध्ये रामलीला मैदानावर संविधान जाळण्यात आले. त्यावर मोदी सरकारने आजपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही.
युपीएससीच्या परीक्षा न घेताच थेट भरती करून एका विशिष्ट जातीच्या मुला-मुलांची संयुक्त सचिव पदावर भरती करून आरक्षणाच्या लाभापासून गरिबांच्या मुलांना वंचित ठेवण्याचे पाप भाजपने केले आहे. भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे संविधान मानत नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाच्या जागी मनुस्मृती आणून जनतेला पुन्हा गुलाम बनवण्याचा भाजप आणि संघाचा कुटील डाव आहे, हे जनतेला माहित आहे. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ असून भाजपच्या भुलथापांना बळी पडणार नाही, असेही नाना पटोले म्हणाले.
शिवसेना ठाकरे गटाने जागावाटप होण्यापूर्वीच आपल्या काही संभाव्य उमेदवारांना एबी फॉर्म वाटल्याच्या चर्चा आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पत्र लिहून आपली नाराजी उद्धव ठाकरे यांना कळवल्याचे समजते. मात्र या बाबीवर भाष्य करणे नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी टाळले.