

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : मराठा समाज निवडणुकीमध्ये सक्रीय आहे. त्यांना काय करायचे ते बरोबर कळते. ते वाट बघत असले तरी वेळेवर बरोबर काम करणार आहेत. या लोकांचा 25 दिवसांचा पोळा संपला की, आमचे आंदोलन सुरू करणार आहे, असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी सांगितले. ते आज (दि.९) अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, मराठा समाज विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Polls) ११३ जणांना पाडणार आहे. मी समाजाला सरळ सांगितले आहे, कोणालाही पाडा आणि कोणालाही निवडून आणा. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळीही मराठा समाजाला सन्मान होता. आता विधानसभेलाही मराठा समाजाला सन्मान असणार आहे. परंतु माझे मत मी समाजावर लादू शकत नाही. त्यांना अडचणी येतील, असे मला वागायचे नाही. कोणाला पाडा कोणाला निवडून आणा, ते बरोबर त्यांच्या हिशोबाने चालतील.
मी वैयक्तिक कोणाला सांगणे म्हणजे समाजाला संकटात आणण्यासारखे आहे. उद्या सत्ता कोणाची येऊ द्या, दोन हात करायची ताकद मराठा समाजामध्ये आहे. आम्ही आमच्या आरक्षणासाठी लढणार आहोत. आम्हाला राजकारणाचा नाद लावून घ्यायचा नाही.
आज पोरं अडचणीत आहेत, आरक्षण नसल्यामुळे आणि शेती मालाला भाव नसल्यामुळे आमचेच लोक अडचणीत आहे, त्यासाठी हा संघर्ष करायचा आहे. आपला आरक्षणात जीव आहे आणि आरक्षणापासून मी भूमिका बदलत नाही. मला मराठा समाज शंभर टक्के आरक्षण देऊन मोकळा करायचा आहे. निवडणुकीत मोठा होण्यासाठी रडरड करणारे खूप आहेत, त्यांनी ही रडरड समाजाच्या आरक्षणासाठी करावी, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.