पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रातील विधानसभेच्या (Maharashtra elections 2024) २८८ जागांसाठी बुधवारी ६५.०२ टक्के मतदानाची नोंद झाली. या वाढलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ''महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी वाढली आहे. माझा आजवरचा अनुभव आहे, जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते, तेव्हा भाजप आणि मित्र पक्षालाला त्याचा फायदा होतो. मला विश्वास आहे की त्याचा फायदा आम्हाला मिळेल आणि महाराष्ट्रात आमचे सरकार स्थापन होईल.''
मला असे वाटते की मतदानाची टक्केवारी ज्या पद्धतीने वाढली आहे, त्यामध्ये प्रो-इन्कम्बन्सी फॅक्टर आहे. लोकांना सरकारबद्दल थोडी आपुलकी वाटते असे त्याचा अर्थ आहे, असाही दावा त्यांनी केला आहे.
महिलांचे मतदान वाढले आहे का? यावर बोलताना फडवणीस यांनी, असे प्राथमिकदृष्ट्या दिसत असल्याचे म्हटले आहे. मी काही मतदारसंघात संपर्क केले. तिथून मला फीडबॅक मिळाला की महिलांची मतदानाची टक्केवारी वाढली आहे, असे त्यांनी नमूद केले.
मतदानाची टक्केवारी लाडकी बहीण सारख्या योजनेमुळे वाढली आहे का? असे विचारण्यात आल्यावर फडणवीस यांनी तशी शक्यता असल्याचे म्हटले आहे. लाडकी बहीण योजनेमुळे महिला मतदारांची टक्केवारी वाढल्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही ते म्हणाले.
संभाव्य अपक्षांशी संपर्क केला जात आहे का? या प्रश्नावर, आम्ही अजूनही कुणाशी संपर्क साधलेला नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्रीपदासंदर्भात काय? या प्रश्नावर बोलताना त्यांनी, अजून काहीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले. परवा निकाल आल्यानंतर आम्ही तिन्ही पक्ष बसू आणि चांगला निर्णय करू, असे ते पुढे म्हणाले.
सत्ताधार्यांनाच 'कौल' देणार्या फॅक्टरला 'प्रो-इन्कम्बन्सी' म्हटले जाते. भारतीय राजकारणातील २१ व्या शतकातील निवडणुका पाहता अँटी -इन्कम्बन्सी नव्हे, तर 'प्रो-इन्कम्बन्सी' ( Pro-Incumbency ) म्हणजे निवडणुकीत सत्ताधारी पक्षालाच पुन्हा निवडून देणे, हा प्रकार वारंवार दिसून आला आहे.