

नांदेड जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघांपैकी ४ मतदारसंघांमध्ये महायुतीमध्ये बंडखोरी झाली आहे. महाविकास आघाडीत नायगाव मतदारसंघातील बंड टाळण्यात स्थानिक नेत्यांना यश आले असले, तरी नांदेड (उत्तर) मतदारसंघात मात्र काँग्रेसला सुटलेल्या जागेवर शिवसेना (उबाठा) पक्षाने आपला उमेदवार दिल्यामुळे आघाडीतल्या ऐक्याला तडा बसला. दिवाळीची धामधूम संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी विधानसभा निवडणुकीसह नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले.
तत्पूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार उभे करण्याचा मनोदय सोमवारी सकाळी मागे घेतल्यामुळे वेगवेगळ्या मतदारसंघांतील त्यांच्या बहुसंख्य समर्थकांनी निवडणुकीतून माघार घेतली. अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर जिल्ह्यात विधानसभेसाठी १६५ तर लोकसभेसाठी १९ उमेदवार निवडणुकीमध्ये राहिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सचिव राहिलेल्या बालाजी खतगावकर यांनी मुखेडमध्ये भाजपा आमदार डॉ. तुषार राठोड यांच्याविरुद्ध बंडाचे निशाण सर्वप्रथम फडकविल्यानंतर त्याचे लोण नांदेड उत्तर व नांदेड (दक्षिण) मतदारसंघात पसरले.
या दोन्ही मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारांविरुद्ध भाजपाच्या मिलिंद देशमुख व दिलीप कंदकुर्ते या प्रमुख पदाधिकार्यांनीच बंडखोरी केली आहे. किनवट मतदारसंघात भाजपा आमदार भीमराव केराम यांच्या विरोधात शिवसेना मंत्री संजय राठोड यांचे मेहुणे अॅड. सचिन नाईक यांनी भरलेला अर्ज कायम ठेवला आहे.
लोहा मतदारसंघात महायुती किंवा आघाडीत बंडखोरी झालेली नसली, तरी या मतदारसंघात महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांना त्यांच्या भगिनी आशा श्यामसुंदर शिंदे यांनी शेकापच्या माध्यमातून आव्हान दिले असून मुखेडमध्ये आ. राठोड यांचे चूलतबंधू संतोष राठोड यांनी अर्ज कायम ठेवून घराण्यातील आजवरचे ऐक्य मोडीत काढले. महाविकास आघाडीतील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे शिरीष बापूसाहेब गोरठेकर यांनी नायगावमधून निवडणूक लढविण्याचा निर्धार आधी केला होता. पण भास्करराव खतगावकर, काँग्रेसचे लोकसभा उमेदवार रवींद्र चव्हाण प्रभृतींनी सोमवारी सकाळी गोरठेकर यांचे मतपरिवर्तन करून त्यांची माघार घडवून आणली.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या भोकर विधानसभा मतदारसंघात तब्बल १४० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. निवडणुकीतून माघार घेण्याच्या मुदतीत त्यांतील १२५ जणांनी माघार घेतली. शेवटच्या दिवशी ९८ उमेदवार बाहेर पडले. मात्र आरक्षण आंदोलनाचे कार्यकर्ते संतोष गव्हाणे यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे.