Political News: भोर विधानसभा मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाली असून, पाच बंडखोरांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. अर्ज माघारीसाठी त्यांची पक्षश्रेष्ठींना मोठी मनधरणी करावी लागणार आहे.
भोर विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतून आमदार संग्राम थोपटे यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवसेना (उबाठा ) गटातून इच्छुक असणार्या शंकर मांडेकर यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापूर्वी शिवसेना (उबाठा) गटाची साथ सोडत महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून अधिकृत उमेदवारी घेऊन शेवटच्या दिवशी कार्यकर्त्यांसोबत जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.
आयत्यावेळी महायुतीमधून शंकर मांडेकर यांना राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यामुळे सलग दोन वेळा काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम थोपटे यांच्याविरोधात लढलेले शिवसेना पक्षाचे कुलदीप कोंडे, तसेच बाळासाहेब चांदेरे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे रणजित शिवतरे, भारतीय जनता पक्षाचे किरण दगडे पाटील, जीवन कोंडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरले. या वेळी सर्वांनीच जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
भोरमध्ये महायुतीकडून पाच जणांनी सध्यातरी बंडखोरी केल्याचे दिसत आहे. उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवसापर्यंत अर्ज माघार घेण्यासाठी त्यांची मोठी मनधरणी करावी लागणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.