शपथविधीसाठी मुंबईतील आझाद मैदान सज्ज, रस्ते वाहतुकीत बदल

Maharashtra CM Oath Ceremony : भव्य कटआऊट्स अन् बॅनर्स; परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप
Maharashtra CM Oath Ceremony
मुंबई : महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी आझाद मैदानात अशा पद्धतीचा तंबू उभारण्यात आला आहे. (छाया : दीपक साळवी)
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा; आझाद मैदान नव्या मुख्यमंत्र्यांच्या आज गुरुवारी होणाऱ्या शपथविधीसाठी (Maharashtra CM Oath Ceremony) सज्ज झाले आहे. या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार असल्याने 'सीएसएमटी' सह मुंबई महानगरपालिका मुख्यालयासह आजूबाजूच्या रस्त्यांना पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. आझाद मैदानातील (Azad Maidan) प्रवेशही बुधवारपासूनच पत्रकारांसह सामान्यांसाठी बंद करण्यात आला.

शपथविधी सोहळ्यासह आजूबाजूला भगवेमय वातावरण तयार करण्यासाठी महायुतीतील तिन्ही पक्षांचे झेंडे संपूर्ण परिसरात लावले जात आहेत. त्याशिवाय अभिनंदनाचे मोठमोठे कटआऊट्स, बॅनर्स लावण्यात येत आहेत. प्रभू रामचंद्रांचे काही कटआऊट्स या ठिकाणी लावण्यात येणार असल्याचे कळते. आझाद मैदान येथे पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार असल्यामुळे बुधवारी तेथील मुख्य स्टेजचा ताबा केंद्रीय सुरक्षा यंत्रणेने स्वतःकडे घेतला.

प्रवेशाच्या ठिकाणी मेटल डिटेक्टर डोअर

गुरुवारी आझाद मैदान परिसरात प्रवेश देताना प्रत्येकाला मेटल डिटेक्टर डोअरमधून जावे लागणार आहे. प्रवेशासाठी दिलेली ओळखपत्रे गळ्यात घालणे बंधनकारक आहे. पोलिसांनी चौकशी केल्यास, संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे. पंतप्रधान व अन्य व्हीआयपी ज्या स्टेजवर बसणार आहेत, तेथील सुरक्षा व्यवस्था 'एसपीजी'ने ताब्यात घेतल्याने तेथे पोलिसांनाही मनाई करण्यात आली आहे.

आझाद मैदानातील अंतर्गत तयारी

  • एकूण तीन स्टेज असून, त्यातील एक मुख्य स्टेज असेल.

  • १०० फूट लांब, ६० फूट रुंद, ८ फूट उंच अशा स्टेजवर पंतप्रधानांसह मुख्यमंत्री व अन्य वरिष्ठ नेते, मंत्री बसणार.

  • दुसरे स्टेज ८० फूट लांब, ५० फूट रुंद ७ फूट उंच. यावर सगळे संत, समाजसेवक व अन्य लोकप्रतिनिधी असतील.

  • तिसरे म्युझिक स्टेज असणार आहे.

  • या तीन स्टेजसमोर खासदार, आमदार यांच्यासाठी जवळपास ४०० आसनांची व्यवस्था.

  • अन्य व्हीआयपींसाठी एक हजार आसने.

  • महायुतीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था.

  • माध्यम प्रतिनिधींसाठी वेगळी व्यवस्था.

  • ३० ते ४० हजार लोक बसतील अशी रचना.

  • मैदानाच्या दोन्ही बाजूंना १६ फूट लांब व ६ फूट उंच कटआऊट्स आणि बॅनर्स असणार.

  • आझाद मैदान व मैदानाबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त.

  • प्रवेशद्वारांवर मेटल डिटेक्टर डोअरसह हँड मेटल डिटेक्टर यंत्रे.

शपथविधीमुळे रस्ते वाहतुकीत बदल

राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा आझाद मैदानात गुरुवारी संध्याकाळी होत आहे. त्यानिमित्त आझाद मैदान आणि आसपासच्या परिसरातील वाहतुकीत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. रस्ते वाहतुकीतील बदल गुरुवारी दुपारी १२ वाजल्यापासून कार्यक्रम संपेपर्यत लागू राहणार आहेत. तसेच आझाद मैदान परिसरात वाहने उभी (पार्क) करण्याची व्यवस्था नसल्याने नागरिक व कार्यकत्यांनी रेल्वेने यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

महानगरपालिका मार्ग

सीएसएमटी जंक्शन ते वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन) दरम्यान दोन्ही वाहिन्या बंद ठेवण्यात येतील. तेथून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी एल. टी. मार्ग, चकाला जंक्शनवरून उजवे वळण डी. एन. रोड सीएसएमटी जंक्शन या पर्यायी मार्गाचा वापर करायचा आहे. तसेच विरुद्ध दिशेने जणाऱ्या वाहनांसाठी महात्मा गांधी मार्गही आवश्यतेनुसार बंद ठेवण्यात येणार आहे. वाहन चालकांनी एल.टी. मार्ग चकाला जंक्शनवरून उजवे वळण डी. एन रोड, सीएसएमटीवरून इच्छितस्थळी मार्गस्थ व्हावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

हजारीमल सोमानी मार्गावरील वाहतूक चाफेकर बंधू चौक (ओ. सी. एस. जंक्शन) ते सीएसएमटी जंक्शन वाहतूक प्रतिबंधित असेल. पर्यायी व्यवस्था म्हणून चाफेकर बंधू चौक (ओ. सी. एस. जंक्शन) हुतात्मा चौक - काळा घोडा, के. दुभाष मार्ग शहिद भगतसिंग मार्गाचा वापर करावा. तसचे प्रिन्सेस स्ट्रिट पूल (मेघदुत ब्रिज) (दक्षिण वाहिनी) (एन. एस. रोड, तसेच सागरी किनारा मार्गाने श्यामलदास गांधी जंक्शनकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार बंद ठेवली आहे. येथून जाणारी वाहने एन. एस. रोड मार्गे वळविण्यात येणार आहेत. तसेच रामभाऊ साळगांवकर रोड (एक दिशा मार्ग) रामभाऊ साळगांवकर रोडवरील इंदु क्लिनिक जंक्शन (सय्यद जमादार चौक ते व्होल्गा चौक सर्व प्रकारच्या वाहनांसाठी दुहेरी मार्गिका दुपारी १२ ते रात्री ८ वाजेपर्यंत खुली आहे.

शपथविधीच्या अनुषंगाने आझाद मैदान परिसरात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व अतिमहत्त्वाच्या व्यक्ती येणार असल्यामुळे सामान्य नागरिकांनी आझाद मैदान व सीएसएमटी येथून प्रवास करताना योग्य नियोजन करावे, तसेच पर्यायी मार्गाचा वापर करावा. वाहतूक बदलाबाबतचे आदेश पोलीस वाहतूक विभागाच्या उपायुक्त (दक्षिण) प्रज्ञा जेडगे यांनी जारी केले आहेत.

Maharashtra CM Oath Ceremony
Maharashtra CM Oath Ceremony : मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news