Maharashtra CM Oath Ceremony : मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी

Maharashtra Politics : साष्टांग दंडवत आणि चार गोष्टींचे संकेत
Maharashtra new CM
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार. File Photo
Published on
Updated on

मुंबई : गेल्या चौदा दिवसांपासून मुख्यमंत्रिपदावरून निर्माण झालेला राजकीय सस्पेन्स अखेर बुधवारी संपला. विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होऊन देवेंद्र फडणवीस यांची नेतेपदी निवड करण्यात आली. गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजता आझाद मैदानात होणार्‍या शानदार सोहळ्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची (Maharashtra CM Oath Ceremony) शपथ घेणार आहेत. यासोबतच एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन उपमुख्यमंत्र्यांचाही शपथविधी होईल.

शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार अथवा नाही, याची चर्चा दिवसभर सुरू होती. मात्र, रात्री फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ते उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास तयार झाल्याचे सांगण्यात आले. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारला पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्यास पाऊण तास उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत महायुतीच्या तिन्ही घटकपक्षांचे किती मंत्री शपथ घेऊ शकतील याचे नियोजन रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

नव्या मंत्र्यांची नावे

कदाचित गुरुवारी सकाळी निश्चित होतील. दुसरीकडे, गुरुवारी फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल, असेही बोलले जाते.

फडणवीसांची नेतेपदी निवड

केंद्रीय पक्षनिरीक्षक म्हणून मुंबईत आलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, भाजप नेते विजय रूपाणी यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधिमंडळ पक्षाचे गटनेता म्हणून निवड करण्यात आली. नेता निवडीवेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षाच्या गटनेतेपदासाठी फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला पंकजा मुंडे, प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण, संजय कुटे, संजय सावकारे, अशोक उईके, मेघना बोर्डीकर, योगेश सागर, संभाजी पाटील-निलंगेकर, गोपीचंद पडळकर, दिलीप बोरसे, आशिष शेलार यांनी अनुमोदन दिले. गटनेतापदासाठी केवळ फडणवीस यांच्या नावाचाच प्रस्ताव आल्याने रूपाणी यांनी फडणवीस यांची सर्वानुमते निवड करण्यात येत असल्याची घोषणा केली आणि सारे सभागृह टाळ्यांच्या गजराने दुमदुमले.

सत्तास्थापनेचा दावा

फडणवीसच मुख्यमंत्री होणार, हे निश्चित झाल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा केला. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह मित्रपक्षांच्या एकूण 237 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांकडे सादर करण्यात आले. यावेळी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, रावसाहेब दानवे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, उदय सामंत, धनंजय मुंडे, आशिष शेलार, विनोद तावडे, रवींद्र चव्हाण, विनय कोरे, प्रसाद लाड आदी नेते उपस्थित होते.दरम्यान, राजभवनात दाखल होण्यापूर्वी ‘वर्षा’ बंगल्यावर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची बैठक पार पडली. त्यानंतर, हे नेते सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी एकाच गाडीतून राजभवनाकडे रवाना झाले.

साष्टांग दंडवत आणि चार गोष्टींचे संकेत

भाजपच्या गटनेतेपदी सर्वानुमते निवड झाल्यानंतर उपस्थित आमदारांना फडणवीसांनी मार्गदर्शन केले. यावेळी महाराष्ट्राच्या जनतेने दिलेल्या आदेशामुळे मी जनतेला साष्टांग दंडवत घालतो, अशी भावना फडणवीस यांनी व्यक्त केली. त्याचवेळी चार गोष्टी आपल्या मनासारख्या व चार गोष्टी मनाविरुद्ध होतील, असे नमूद करत आपल्या भविष्यातील कणखर निर्णयांचे स्पष्ट संकेतही दिले. आपल्याला जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. आपल्याला जनतेच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत. हे करताना आपल्याला महायुतीमधील सर्वांना सोबत घेऊन पुढे जावे लागेल. काहीवेळा सर्वांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत; पण आपण एक मोठा विचार घेऊन राजकारणात आलो आहोत हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे, असे फडणवीस यांनी सांगितले. आमचे सरकार महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रगतीसाठी 24 तास काम करेल व सामान्य माणसांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

2019 ची बेईमानी आणि संघर्षाची आठवण

आपल्याला 2019 मध्येही जनतेचा कौल मिळाला होता. दुर्दैवाने तो हिसकावून घेऊन जनतेशी बेईमानी झाली. सुरुवातीच्या अडीच वर्षांत वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला त्रास देण्यात आला. अशाही परिस्थितीत अडीच वर्षांत एकही आमदार आपल्याला सोडून गेला नाही, याचा मला अभिमान आहे. सगळे आमदार, नेते संघर्ष करत होते आणि त्यामुळेच 2022 मध्ये पुन्हा आपले सरकार तयार झाले. आज पुन्हा एकदा महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. यातून महाराष्ट्रात एकप्रकारे इतिहास लिहिला गेला, असे ते म्हणाले.

मोदींनी सामान्य कार्यकर्त्याला राज्याच्या प्रमुखपदावर बसवले!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझ्यासारख्या बूथचा कार्यकर्ता म्हणून काम करणार्‍याला राज्याच्या प्रमुखपदावर तीनवेळा बसवले. ज्याप्रकारे हा पक्ष त्यांच्या नेतृत्वात मोठा झाला त्यातूनच सामान्य कार्यकर्त्यांना वेगवेगळी पदे मिळाली आणि काम करण्याची संधी मिळाली. यासाठी मी त्यांचे आभार मानतो. महायुतीच्या सरकारमध्ये सर्वांना एकदिलाने सोबत घेऊन काम करावे लागेल. केवळ पदांसाठी नाही, तर एक मोठे ध्येय घेऊन आपण राजकारणात आलो आहोत. त्यामुळे येत्या काळात चार गोष्टी मनाप्रमाणे होतील, तर चार गोष्टी मनाविरुद्धसुद्धा होतील. तरीसुद्धा आपण एकत्रितपणे काम करून आपली शक्ती दाखवून देऊ, असा विश्वासही त्यांनी उपस्थित आमदारांना दिला.

टीम म्हणून काम करणार : शिंदे

पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी पुढील काळातही देवेंद्र फडणवीस, अजित पवारांसोबत टीम म्हणून काम करणार असल्याचे सांगितले. त्याचवेळी अडीच वर्षांपूर्वी राजभवनावर देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या नावाची शिफारस केली होती. आज मी त्याच जागेवरून त्यांच्या नावाची शिफारस करत आहे, याची आठवण त्यांनी करून दिली. ते म्हणाले, मी गावी गेलो तरी नाराजीच्या बातम्या चालवल्या गेल्या. तथापि, अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सरकार स्थापन होतेय याचा मला आनंद आहे. आम्हाला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. अडीच वर्षांत आम्ही केलेल्या कामामुळे जनतेने आमच्यावर मतांचा वर्षाव झाला. फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा पाच वर्षांचा अनुभवही आम्हाला कामाला आला. पुढच्या काळातही टीम म्हणून काम करू, असे शिंदे म्हणाले.

खासगी कामांसाठी दिल्लीला गेलो होतो ः अजित पवार

आपण दिल्लीत खासगी कामासाठी गेलो होतो. ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्याकडे भेटीची वेळ मागितली नव्हती, अशी माहिती अजित पवार यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, पत्नीला राज्यसभा खासदार म्हणून मिळालेल्या बंगल्याची सजावट कशी करायची, याबाबत वास्तुविशारदाशी चर्चा केली. तसेच, राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत सध्या न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यात वकिलांची भेट घेतली आणि एका लग्न समारंभाला उपस्थित राहिलो. अमित शहा यांच्याशी खातेवाटपाबद्दल चर्चा करण्यासाठी अजित पवार दिल्लीला गेल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याबद्दल विचारणा केली असता त्यांनी आपण वैयक्तिक कामांसाठी दिल्लीला गेल्याचे स्पष्ट केले.

‘मी पुन्हा येईन’ प्रतिज्ञा पूर्ण

‘मी पुन्हा येईन’ ही 2019 मध्ये केलेली देवेंद्र प्रतिज्ञा पूर्ण होण्याचा क्षण गुरुवारी अवतरणार आहे. देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच ‘मी पुन्हा येईन’ ही त्यांची प्रतिज्ञा पूर्ण होईल. पाच वर्षांपूर्वी त्यांनी केलेली ही प्रतिज्ञा संपूर्ण देशभर गाजली आणि चर्चितही ठरली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news