

कोल्हापूर : शिरोली दुमाला (ता. करवीर) येथे काँग्रेसला खिंडार पडले असून, तुळशी सहकार समूहाने महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार चंद्रदीप नरके यांना पाठिंबा जाहीर केला आहे. समूहप्रमुख सरदार शिवाजीराव पाटील यांनी कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा घेऊन कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेचे उमेदवार चंद्रदीप नरके यांना पाठिंबा जाहीर केल्याने काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी धोंडिराम देसाई होते.
सरदार पाटील यांनी गेली १५ वर्षे काँग्रेसमध्ये कार्य करत असताना तुळशी सहकार समूहाची हेळसांड झाल्याचे सांगितले. समूहातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून कोणतीही अपेक्षा न करता नरकेंना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.
माजी आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, दिवंगत शिवाजीराव कृष्णा पाटील यांनी सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी आयुष्यभर काम केले. १९९४ च्या कुंभीच्या निवडणुकीत काही लोकांनी सहकारी संस्था गटातून त्यांना आपल्याविरुद्ध उभा करण्यासाठी प्रयत्न केला होता; मात्र त्यांनी प्रत्यक्ष भेटून आपल्या पहिल्याच राजकीय इनिंगला पाठिंबा दिला. त्यांना भविष्यात योग्य तो न्याय देणार देऊ. येत्या पंधरा दिवसांत कॉंग्रेसचे कार्यकर्ते तुमच्यामध्ये मतभेद निर्माण करतील, अफवांवर विश्वास न ठेवता महायुतीचे काम घरोघरी पोहोचवा.
गोकुळचे संचालक अजित नरके म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्य जनतेसाठी सरकारची तिजोरी खुली केली आहे. कर्तृत्वावर मोठ्या झालेल्या चंद्रदीप नरके यांचे शिवसेनेचे वादळ विधानसभेत पाठवा. माजी जि. प. पाटील, कुंभीचे सदस्य पुंडलिक संचालक किशोर पाटील, अनिल पाटील, पैलवान ज्ञानेश्वरी सरदार पाटील, गजानन सुभेदार, दादासो देसाई यांची भाषणे झाली. आभार विलास सुभेदार यांनी मानले. यावेळी तुळशी दूध संस्थेचे चेअरमन सर्जेराव सुभेदार, धुळोबा पाटील, संजय पाटील ग्रा.पं. सदस्य अरुण पाटील, वैशाली परीट, गायत्री सुभेदार, सागर घोटणे, रामचंद्र पाटील, सर्जेराव पाटील, तानाजी पाटील, अरुण देशमुख, उत्तम सारंग, तानाजी कुंभार, गजानन सुभेदार, दादासो देसाई, पै. नितीन पाटील, सदाशिव पोवार, रघुनाथ कांबळे, मारुती पाटील, संदीप पोवार, दिलीप देशमुख यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यशवंत बँकेचे माजी अध्यक्ष एकनाथ पाटील म्हणाले, ६ ऑक्टोबरपासून नरके गटात इतके प्रवेश सुरू आहेत. 'ये तो सिर्फ झाकी है, पिक्चर अभी बाकी है' अशी शेरोशायरी करून चंद्रदीप नरके यांनी शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांना हजारो स्कार्फ दिल्याचे सांगितले.