

नागपूर : Maharashtra Assembly Polls | विधानसभा निवडणुकीत उमेदवारीचे अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे दोन दिवस उरले आहेत. सोमवार राज्यभरात बंडखोरांचा वार ठरू शकतो. अशावेळी महायुतीचे, महाविकास आघाडीचे अंतिम जागावाटप जाहीर झालेले नाही. उद्यापर्यंत ते जाहीर झालेले असेल; मात्र महायुतीत काहीअंशी भाजपचे नुकसान झाल्याचे दिसत असले, तरी त्यांनी आपल्या अनेक इच्छुकांच्याहाती मित्र पक्षाचा झेंडा देत संख्याबळाचे गणित जुळविण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे फार पूर्वीच मोठा भाऊ म्हणून या निवडणुकीला सामोरे जाणार्या काँग्रेसला मात्र शरद पवार यांनी बॅकफूटवर नेल्याचे तूर्तास दिसत आहे. जो अधिक जागा लढणार त्याचे उमेदवार अधिक निवडून येणार आणि मग मुख्यमंत्री त्याच पक्षाचा होणार. यानिमित्ताने पवार यांचे भविष्यातील पत्तेही उघड झाले, असे म्हटल्यास नवल नाही.
विदर्भातील 62 पैकी गेल्यावेळी भाजपला 29, शिवसेनेला 4, राष्ट्रवादीला 6, अपक्ष 8, तर काँग्रेसला 15 जागा मिळाल्या होत्या. यावेळी विदर्भात काँग्रेसला चांगली संधी दिसत होती. आज मात्र काँग्रेसची काहीअंशी विविध कारणांनी पीछेहाट होताना दिसत आहे. चार महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने बोलताना 90-90-90 आणि मित्र पक्षांना उर्वरित 18 जागा असा आमचा फॉर्म्युला फायनल होईल, असे सांगितले. ते गणित यानिमित्ताने तंतोतंत खरे होताना दिसत आहे. याचाच अर्थ महाविकास आघाडीत ही खेळी फार पूर्वीच ठरल्याचे उघड आहे. एकीकडे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सातत्याने काँग्रेस सर्वाधिक 105 जागा लढेलच, असा दावा केला; मात्र या दाव्यातील हवा आता निघताना दिसत आहे. निर्णायक टप्प्यात आक्रमकपणे पुढे जाणार्या पटोले यांना शिवसेनेच्या नाराजी नाट्याचे कारण पुढे करीत दूर करणेही आता लपून राहिलेले नाही. उदाहरणच द्यायचे झाल्यास नागपूरचा विचार करता एकमेव नगरसेवक असताना पूर्व नागपूर ही जागा काँग्रेसकडून राष्ट्रवादीने लीलया काढून घेतली. आता हिंगणा मतदारसंघही माजी मंत्री सुनील केदार यांचा राजहट्ट असूनही सोडावा लागला. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक अजूनही वेटिंगवर आहेत. रामटेक उबाठा गटाने नेले. काँग्रेसच्या आतापर्यंत तीन याद्या जाहीर झाल्या. यात 87 उमेदवार जाहीर झाले; मात्र बहुतांश जुनेच चेहरे द्यायचे, तर तिकीट वाटपाला इतका विलंब का, असा सवाल आता पदाधिकारी, कार्यकर्ते करीत आहेत. एकंदरीत नव्या चेहर्यांचा पुन्हा एकदा हिरमोड झाला. आता यातीलच अनेक जण बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत.
राज्यात अनेक भागांत शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) विरुद्ध राष्ट्रवादी (अजित पवार) असे चित्र असले, तरी विदर्भात अनेक जागी काँग्रेस आणि भाजप अशीच लढत होणार आहे. असे असले तरी बंडखोरांची चिंता बेदखल करता येणार नाही. कारण, काँग्रेसला काँग्रेसच हरवू शकते हा आजवरचा इतिहास आहे. एकीकडे लाडकी बहीण महायुतीच्या भाजप-शिंदे गटाच्या मदतीला येणार असल्याचे दिसत असताना आणि त्यांचा पहिल्या टप्प्यातील प्रचार विविध सभा, मेळाव्यांच्या माध्यमातून झालेला असताना जागा वाटपाच्या गुंतागुंतीतच अडकलेल्या काँग्रेसला महागाई, बेरोजगारी, शेतकरी उपेक्षा असे महत्त्वाचे मुद्दे लावून धरण्यात अद्याप तरी यश आलेले दिसत नाही.