कोल्हापूर : करवीर विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचे व्हिजन घेऊन निवडणुकीस सामोरे जाणारे महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल पी. पाटील यांना विजयासाठी साथ देऊन स्व. आमदार पी. एन. पाटील यांना खरी श्रद्धांजली वाहूया, असे आवाहन आ. जयंत आसगावकर यांनी केले. सांगरूळ येथे सांगरूळ पंचायत समिती मतदारसंघातील कार्यकत्यांच्या मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
आ. आसगावकर म्हणाले, स्व. आ. पी. एन. पाटील यांनी मतदारसंघाच्या विकासाचे अनेक प्रश्न विधानसभेत मांडून त्यासाठी कोट्यवधींचा भरघोस निधी खेचून आणला. त्यांचे सुपुत्र राहुल पाटील म्हणजे अस्सल चोवीस कॅरेटचे सोने आहे. त्यांना आमदार करून 'एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह चे पर्व सुरू ठेवूया.
राहुल पाटील म्हणाले, धामणी प्रकल्प पूर्ण व्हावा म्हणून स्व. आमदार पी. एन. पाटील यांनी तीनशे कोटींचा निधी आणला. जुन्या कंत्राटदाराचे १०६ कोटींचे देणे शासनाला द्यायला लावले. म्हणूनच त्यांचा वारस या नात्याने या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारून उपस्थित राहिलो; पण तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचे असताना तुम्हाला निमंत्रण दिले नाही. गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, विश्वास पाटील, निवृत्ती चाबूक, डॉ. अनिता जंगम, अर्चना खाडे, जयसिंगराव हिर्डेकर, शशिकांत खोत, यशवंत खाडे, चेतन पाटील, सचिन पाटील, बाजीराव पाटील, रवींद्र पाटील, भरत खाडे, बाळासो यादव, अर्जुन पाटील उपस्थित होते. प्रकाश मुगडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कृष्णात चाबूक यांनी आभार मानले.
चंद्रदीप नरके हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मते मागत आहेत; मात्र बाळासाहेबांचे नाव घ्यायची त्यांची पात्रता नाही. त्यांनी बाळासाहेबांच्या नावाने मते मागू नयेत, असे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते प्रशांत नाळे म्हणाले.