

चंदगड : पुढारी वृत्तसेवा : चंदगड विधानसभा मतदारसंघासाठी काल सोमवारी विक्रमी अर्ज दाखल झाले. महाविकास आघाडीच्या डॉ. नंदा बाभूळकर, अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील, अपक्ष मानसिंग खोराटे यांनी शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल केले. महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार अप्पी पाटील व गोपाळराव पाटील यांनी साधेपणाने अर्ज दाखल केले.
डॉ. बाभूळकर यांचा अर्ज दाखल करताना खा. शाहू महाराज, माजी पालकमंत्री सतेज पाटील उपस्थित होते. दुपारी दोन वाजेपर्यंत खोराटे व बाभूळकर यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी सभा झाल्या. चंदगड शहरातील रस्ते खूपच अरुंद असल्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली. यामुळे पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.
सोमवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांत गोपाळराव पाटील-अपक्ष (शिवणगे), मानसिंग खोराटे (हालेवाडी), विनायक ऊर्फ अप्पी पाटील-अपक्ष (महागाव), अण्णासाहेब पाटील (महागाव), शिवाजी पाटील-अपक्ष (सावर्डे), नंदिनी बाभूळकर-राष्ट्रवादी शरद पवार गट (कानडेवाडी), राजेश नरसिंगराव पाटील राष्ट्रवादी अजित पवार गट (म्हाळेवाडी), सुश्मिता राजेश पाटील राष्ट्रवादी (म्हाळेवाडी), अक्षय एकनाथ डवरी (नेसरी), मनीषा मानसिंग खोराटे (हालेवाडी), श्रीकांत अर्जुन कांबळे (चंदगड), सीमादेवी कृष्णराव देसाई (कानडेवाडी), संध्यादेवी कृष्णराव देसाई-कुपेकर (कानडेवाडी) यांनी एकूण २० अर्ज दाखल केले.