नायगाव, पुढारी वृत्तसेवा : आ. राजेश पवार यांना आजपर्यंत भाजपातील जुन्या निष्ठावंतांशी तर जुळवून घेण्याचे तर जमलेच नाही; पण एकतर्फी वागण्याने आहेत ते कार्यकर्ते दुरावलेत. त्यातच खा. चिखलीकर व आ. राम पाटील रातोळीकर यांच्याशी त्याची रास जुळली नाही. या सर्व प्रकारामुळे भाजपमध्ये मोठी धुसफूस सुरू असून, नाराज झालेल्या या निष्ठावंतांनी ऐन निवडणुकीत प्रचारापासून अलिप्त राहणेच पसंत केल्याने राजेश पवार पक्षातच एकाकी पडले आहेत.
विद्यमान आमदार राजेश पवार हे २०१४ च्या पराभवानंतर २०१९ च्या मोदी लाटेत निवडून आलेत. आमदार झाल्यानंतर राजेश पवार यांनी भाजपच्या जुन्या पदाधिकाऱ्यांशी तर सोडाच एकाही कार्यकत्यांशी जुळवून घेतले नाही. ते स्वतः व त्यांची पत्नी एवढेच सीमित कार्यक्षेत्र झाले. त्याचबरोबर जिल्ह्याचे माजी खा. प्रताप पाटील चिखलीकर व विधान परिषदेचे माजी आ. राम पाटील रातोळीकर यांच्याशीही त्यांचे कधीच जुळले नाही. त्यामुळे नायगाव तालुक्यात भाजपमध्ये प्रचंड गटबाजी वाढली. भाजपचे जुने निष्ठावंत बालाजी बच्चेवार, श्रावण पाटील भिलवंडे, शिवराज पा. होटाळकर, धनराज शिरोळे यांना विविध समित्यांवर नियुक्त्या मिळू दिल्या नाहीत. उलट पक्ष बांधणी व पदाधिकाऱ्यांच्या निवडीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आले आहेत.
नायगाव तालुक्यात प्रताप पाटील चिखलीकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्याचबरोबर नातेवाईकांचेही जाळे आहे. राम पाटील रातोळीकर हे रातोळीचे भूमिपुत्र असल्याने त्यांचेही तालुक्यात चांगलेच प्राबल्य आहे. त्याचबरोबर बालाजी बच्चेवार हे दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत. त्यांचा नायगाव व बरबडा भागात चांगला जनसंपर्क राहिलेला आहे. शिवराज पाटील होटाळकर हे तर जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती राहिलेले आहेत. श्रावण पाटील भिलवंडे हे पंचायत समितीचे सभापती होते. त्यामुळे वरील सर्व जुन्या जाणत्यांच्या शब्दाला नायगाव तालुक्यात किंमत आहे. त्याचबरोबर होटाळकरांनी तर चक्क बंडच केले हे विशेष.
विशेष म्हणजे गणेशराव करखेलीकर यांनी तर आ. पवारांची साथ सोडून थेट काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर बाजार समितीचे संचालक व आ. पवारांचे मावसभाऊ राजीव पाटील बोळ- सेकर हे प्रचारापासून दूरच आहेत. तसेच शिवराज गाडीवान, विद्या अग्रवाल, अशोकराव पाटील वडजे, गोविंदराव रामोड, नारायण पाटील पवार, सुभाषराव खांडरे, सुधाकरराव देशमुख धानोरकर, पाडुरंग गळगे, ललैस पाटील मंगनाळीकर, डी. आर. कंदकुर्तीकर, किशन गायकवाड, सदानंद वडजे, सोमनाथ हेमके, संतोष मुटकूटवार, गजानन श्रीरामवार यांच्यासह अनेकांनी प्रचारापासून पाठ फिरवली आहे.
मतदार संघातील प्रमुख पदाधिकारी तर आ. राजेश पवार यांच्या प्रचारापासून दूर आहेतच; पण, नायगाव तालुक्याचे भूमिपुत्र असलेले माजी आ. राम पाटील रातोळीकर यांनाही प्रचारात स्थान नाही. त्यामुळे आ. राजेश पवार यांच्या एककलमी कार्यक्रमाला सर्वच पदाधिकारी वैतागले तर नाहीत ना, अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे.