छत्रपती संभाजीनगर : पुढारी वृत्तसेवा : शिवसेना उबाठा पक्षाच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिलेले माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनी गुरुवारी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत तनवाणी यांच्यासोबतच उबाठा गटाच्या दोन डझन पदाधिकाऱ्यांनाही शिवसेनेत प्रवेश देण्यात आला.
चिकलठाणा विमानतळासमोरील हॉटेलमध्ये गुरुवारी प्रवेश सोहळा पार पडला. याप्रसंगी खासदार संदीपान भुमरे, आमदार संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री शिंदे यांनी तनवाणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले. प्रवेश घेतलेल्यांमध्ये उबाठाचे पश्चिमचे शहर संघटक सुशील खेडकर यांचाही समावेश आहे.
विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत शिवसेना उबाठा पक्षाला मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे. काही दिवसांपूर्वी शहरप्रमुख विजय वाघचौरे, उपजिल्हाप्रमुख संजय बारवाल, बप्पा दळवी यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला होता. त्यापाठोपाठ उबाठा गटाचे माजी आमदार किशनचंद तनवाणी हे देखील शिवसेनेत दाखल झाले. काही दिवसांपूर्वीच तनवाणी यांनी मध्य मतदारसंघातून ठाकरेंच्या सेनेने त्यांना दिलेले उमेदवारी परत केली होती.