

मिलिंद सजगुरे
Maharashtra Assembly Polls | विधानसभा निवडणुकीचा शंखनाद झाल्यानंतर इच्छुकांना आता विजयश्री प्राप्तीचे वेध लागले आहेत. उत्तर महाराष्ट्रात सत्तेतल्या महायुतीने गेल्या काळात राबवण्यात आलेल्या जनताभिमुख योजनांच्या आधारे मतदारांना वळते करण्याचा, तर विरोधी महाविकास आघाडी (मविआ) कडून सत्ताधार्यांच्या अपयशाचा पाढा वाचण्याचा जोरकस प्रयत्न राहणार असल्याने अखेरच्या टप्प्यापर्यंत निवडणूक चुरशीची होणार, हे स्पष्ट झाले आहे.
नाशिकसह धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांना गवसणी घालणार्या उत्तर महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 35 जागा आहेत. यापैकी सर्वाधिक 15 नाशिक, तर पाठोपाठ 11 जळगाव, पाच धुळे आणि चार नंदुरबार जिल्ह्यात आहेत. नाशिक जिल्ह्यात छगन भुजबळ आणि दादा भुसे या मंत्रिगणांसह दिग्गज मैदानात असल्याने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.अकरा जागा असलेल्या जळगावमधील प्रत्येक मतदारसंघात विजयासमीप जाण्यासाठी प्रचंड चुरस दिसून येत आहे.गिरीश महाजन, अनिल पाटील, गुलाबराव पाटील या मंत्रिगणांसह राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या उमेदवारीमुळे जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघणार आहे. धुळ्यातील पाच ठिकाणीही दिग्गजांच्या एंट्रीमुळे चुरस राहणार असल्याचे स्पष्ट आहे. फारूक शाह, कुणाल पाटील, जयकुमार रावल आदी विद्यमान आमदारांना यंदा विजयश्रीपर्यंत पोहोचण्यासाठी घाम गाळावा लागणार आहे. नंदुरबारमधील लक्षवेधी लढत शहरात डॉ. विजयकुमार गावित यांच्या उमेदवारीमुळे असणार आहे. शिवाय, के. सी. पाडवी, राजेश पाडवी, शिरीष नाईक ही नावेदेखील दखलपात्र आहेत. सर्व चारही ठिकाणी लक्षवेधी लढती अपेक्षित आहेत.