छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात उमेदवारी अर्ज भरण्याच्या मंगळवारी (दि. २९) शेवटच्या दिवशी इच्छुकांची झुंबड उडाली. सर्व नऊ मतदारसंघांत उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल केले. अखेरच्या मुदतीपर्यंत जिल्ह्यात साडेतीनशेहून अधिक उमेदवारांचे सुमारे ५८८ अर्ज दाखल झाले आहेत.
जिल्ह्यात २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली होती. सुरुवातीच्या दोन दिवसांत खूप कमी अर्ज दाखल झाले होते. मात्र काल सोमवारी आणि आज मंगळवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची रांग लागली. अखेरच्या मुदतीपर्यंत जिल्ह्यात औरंगाबाद पूर्व मतदारसंघात सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल झाले. या ठिकाणी मंगळवारी ४८ जणांचे ६९ अर्ज दाखल झाले. तर पहिल्या दिवसापासून आतापर्यंत येथे एकूण ७८ उमेदवारांचे ११० अर्ज दाखल झाले आहेत. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात मंगळवारी दिवसभरात २२ जणांनी ३१ उमेदवारी अर्ज दाखल केले.
तर पहिल्या दिवसापासून शेवटच्या मुदतीपर्यंत येथे एकूण ३० जणांचे ४७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. औरंगाबाद मध्य मतदारसंघात २५ जणांनी ३० अर्ज दाखल केले. आतापर्यंत एकूण ३६ उमेदवारांचे ४७ अर्ज दाखल झाले आहेत. सिल्लोड मतदारसंघात एकूण ५६, कन्नड मतदारसंघात ७४, गंगापूर मतदारसंघात ७१, वैजापूर मतदारसंघात ३७, फुलंब्री मतदारसंघात ७९, पैठण मतदारसंघात ७८ अर्ज दाखल झाले आहेत.
सर्व प्राप्त अर्जाची उद्या बुधवारी त्या त्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात छाननी होणार आहे. त्यानंतर अंतिम यादी प्रसिद्ध होईल. पुढे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ४ नोव्हेंबरपर्यंतची मुदत असणार आहे.
३० ऑक्टोबर: नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल
४ नोव्हेंबर : नामनिर्देशनपत्र माघारी घेण्याची अंतिम मुदत
२० नोव्हेंबर : मतदानाचा दिवस
२३ नोव्हेंबर : मतमोजणी