

जयसिंगपूर : आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भारतीय जनता पार्टी व राजर्षी शाहू विकास आघाडी एकत्र लढण्याचा निर्धार करून आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना भाजपच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. सोमवारी संयुक्त पत्रकार बैठकीत गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी हा निर्णय जाहीर केला.
माधवराव घाटगे म्हणाले, भाजपचे विजय भोजे व मुकुंद गावडे यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतला आहे. महायुतीकडून राजेंद्र पाटील-यड्रावकर उमेदवार असणार आहेत. राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना पाठिंबा देऊन निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करूया. आगामी नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती यासह इतर निवडणुका भाजप व राजर्षी शाहू विकास आघाडी एकत्र लढणार आहे. आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, रामचंद्र डांगे, मुकुंद गावडे, शिवाजीराव सागले, भाजपचे मंडल अध्यक्ष मिलिंद भिडे, संतोष जाधव, महेश देवताळे, रमेश यळगुडकर, राजेंद्र दाईंगडे, पंकज गुरव यांच्यासह भाजपाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे यांच्या नेतृत्वाखाली भाजपची वाटचाल सुरू आहे. त्यांच्या पाठिंब्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. सोमवारी त्यांनी भूमिका स्पष्ट केल्याने आ. यड्रावकर यांचा विजय सुकर होणार आहे. तालुक्यात माधवराव घाटगे व शिरोळ तालुका भाजपची जवळपास 50 हजार मतांचा गठ्ठा असल्याचे याआधीच्या निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे.